जळगाव मतदारसंघ तर भाजपाचा बालेकिल्ला - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:37 PM2019-02-05T15:37:24+5:302019-02-05T15:37:53+5:30

विकासात्मक भूमिकेमुळे जनतेचे पाठबळ कायम

Jalgaon constituency and BJP's citadel | जळगाव मतदारसंघ तर भाजपाचा बालेकिल्ला - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ

जळगाव मतदारसंघ तर भाजपाचा बालेकिल्ला - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ

Next

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्व. उत्तमराव पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघाचा विकास भाजपाने केला असून जनतेचा भाजपावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका आणि जळगाव मतदारसंघातील एक प्रबळ दावेवार असलेल्या उदय वाघ यांच्याशी ‘लोकमत’ने ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमात संवाद साधला. त्यावेळी वाघ यांनी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न : पण तुम्ही स्वत: इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याचे काय?
वाघ : विषय तसा नव्हता. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अमळनेरला आले असताना त्यांनी पुढील उमेदवार हे ए.टी.पाटील असतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर मला काही पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रश्न विचारला असता मी भाजपामध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया असते. एकापेक्षा अनेक इच्छुक असतात. मलाही वाटते की, मी लोकसभा निवडणूक लढवावी. तसे अनेकांना वाटू शकते. पक्षाची केंद्रीय संसदीय समिती या सगळ्यांच्या मुलाखती घेते, उमेदवाराचे मूल्यांकन करते आणि नंतर उमेदवार निश्चित होतो, असे स्पष्टीकरण दिले होते.
प्रश्न : पक्षाने तुमच्याकडे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली, हा तुमच्या संघटनात्मक गुणांचा गौरव म्हणावा लागेल?
वाघ : मी मघाशी म्हटले की, मी निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी संपूर्ण क्षमतेने पार पाडत आलो आहे. पक्ष केंद्र व राज्यात सत्तेत असताना मला जिल्हाध्यक्षपदी मुदतवाढ मिळाली, याचा मला खूप आनंद झाला. माझ्या सर्व पदाधिकारी आणि सहकाºयांच्या प्रयत्न आणि कष्टामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपा थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी झालेल्या ४९८ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने ३७२ ठिकाणी लोकनियुक्त सरपंचपद मिळविले. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर भाजपाने चांगले यश मिळविले आहे.
प्रश्न : पाच वर्षातील भाजपा सरकारची जिल्ह्याच्या दृष्टीने उपलब्धी काय सांगाल ?
वाघ : जलसंपदा विभागाची मोठी कामे या काळात झालेली आहे. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. पर्यावरण विभाग, जलआयोगाच्या मंजुरी बाकी होत्या. आता सगळे अडथळे दूर झाले आहेत. नाबार्डच्या निधीतून या धरणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. गिरणा नदीवरील बलून बंधाºयांना मान्यता मिळाली आहे. नार-पार योजनेसाठी निधी देण्याचे केंद्र सरकारने मान्य केल्याने गुजरातमध्ये जाणारे पाणी गिरणा नदीत वळवता येणार आहे. ग्रामीण रस्ते ते महामार्ग, नव्या रेल्वे गाड्या, विमानसेवा अशा दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम नवे उद्योग येण्यात आणि रोजगार वाढण्यात निश्चित होईल.
प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यास तुम्ही इच्छुक आहात काय?
वाघ : मी भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आहे. भाजपामधील कार्यकर्ता हा कोºया पाकिटासारखा असतो. पक्ष पाकिटावर जबाबदारी लिहितो आणि कार्यकर्ता ती प्रामाणिकपणे निभावतो. ही भाजपामधील कार्यसंस्कृती आहे.

Web Title: Jalgaon constituency and BJP's citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.