जळगाव मतदार संघासाठी २१ जणांचे ३४ तर रावेर मतदार संघासाठी १६ जणांचे २६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:22 PM2019-04-05T12:22:00+5:302019-04-05T12:22:46+5:30
८ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत जळगाव मतदार संघात १५ जणांनी २२ अर्ज तर रावेर मतदार संघासाठी १२ जणांनी १७ अर्ज दाखल केले. त्यानुसार जळगाव मतदार संघात एकूण २१ जणांचे ३४ अर्ज तर रावेर मतदार संघात एकूण १६ जणांचे २६ अर्ज दाखल झाले. या दाखल अर्जांची ५ एप्रिल छाननी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जळगाव व रावेर मतदार संघासाठी २८ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान या सात दिवसात जळगाव मतदार संघात अर्जांची संख्या कमी होती. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढून एकाच दिवसात १५ जणांनी जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे २२ अर्ज दाखल केले.
अशाच प्रकारे रावेर मतदार संघात २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान या सात दिवसात अर्जांची संख्या कमी होती. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची येथेही संख्या वाढून एकाच दिवसात १२ जणांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे २६ अर्ज दाखल केले.