जळगावात फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर, फटाकेमुक्त दिवाळी संकल्पाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:21 PM2017-10-22T23:21:55+5:302017-10-22T23:24:08+5:30
तीन हजार कोटींवरून दीड हजार कोटींवर घसरण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22- फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व सरकारच्या निर्णयामुळे यंदा दिवाळीमध्ये फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर आली आहे. जळगावात दरवर्षी दिवाळीमध्ये साधारण तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा ही उलाढाल थेट दीड ते दोन कोटींवर आली आहे. यामुळे व्यावसायिक चिंतीत असून या बाबत सकारात्मक विचार होणे गरजेचे असल्याचा सूर उमटत आहे.
दिवाळी म्हटले म्हणजे फटाक्यांची जोरदार आतशबाजी हे शेकडो वर्षाचे गणित आहे. मात्र हल्ली फटाक्यांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे सांगून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आल्याने त्याचा यंदा मोठा परिणाम दिसून आला.
सरकारच्या निर्णयाचा परिणाम
दिवाळीसाठी फटाके निर्मिती, विक्रीची तयारी झालेली असताना दिवाळीच्या आठवडाभर अगोदर सरकारने 9 ऑक्टोबर रोजी निवासी परिसरात फटाके विक्रीस बंदी घातल्याचा निर्णय घेतला. जळगावात अशी परिस्थिती नसली तरी यातून छोटय़ा छोटय़ा विक्रेत्यांनी धास्ती घेतली. परिणामी होलसेल विक्री होणा:या मालावर परिणाम झाला.
फटाके मुक्तीचा संकल्प
विविध सामाजिक संस्थांनी फटाके न फोडण्याचे आवाहन केल्याने अनेक जण फटाक्यांपासून लांब राहिले. या सोबतच शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्याथ्र्याना देण्यात आली. त्यामुळे लहान मुलांचे जेवढे प्रमाण फटाके फोडण्यात असते, त्यात मोठी यंदा घट झाली.
विक्रेते हवालदिल
फटाक्यांचा व्यवसाय करण्यासाठी संबंधित व्यावसायिक एकूण 9 ठिकाणाहून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासह वेगवेगळ्य़ा पूर्तता कराव्या लागतात. यामुळे यासाठी वर्षभरापूर्वीपासूनच तयारीला लागावे लागते. एवढे करून दिवाळीच्या आठवडाभरापूर्वी सरकारच्या निर्णयाने विक्रेत्यांना वेठीस धरल्याचे सांगितले जात आहे.
प्रदूषण केवळ 0.4 टक्के
दिवाळीमध्ये फटाके फोडल्याने प्रदूषण वाढते, असे सांगून फटाके फोडण्यावर बंदीचे आवाहन केले जाते. मात्र प्रत्यक्षात वाहनांच्या व वर्षभरातील इतर प्रदूषणाच्या प्रमाणात दिवाळीत होणा:या प्रदूषणाचे प्रमाण केवळ 0.4 टक्केच असल्याचा दावा फटाका विक्रेत्यांचा आहे.
यंदा प्रदूषणमुक्तीबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिकांनी फटाक्यांची खरेदी कमी केली. त्यामुळे उलाढाल निम्म्यावर आली असून होलसेल विक्रेत्यांकडे माल पडून आहे. पुढील वर्षी मालाचे प्रमाण कमी करण्याचा अंदाज आहे.
- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ तथा फटाके व्यावसायिक
दिवसेंदिवस फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात असल्याने फटाके विक्रीचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे यंदा फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर आली आहे.
- हरीश मिलवाणी, फटाके व्यावसायिक.