जळगावात मनपा उपायुक्तांच्या गळयात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:58 PM2017-12-12T18:58:46+5:302017-12-12T19:06:09+5:30
वृक्ष प्राधिकरण बैठकीतील प्रकार : राजीनामा देऊनही अजेंडा पाठविल्याने मनसे नगरसेवकाचा नाराजीतून प्रयत्न
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१२ : वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वारंवार तहकुब होणे, राजीनामा देऊनही सभेला बोलावणे या प्रकारातून नाराजी झालेले मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या गळ्यात बटाट्याची माळ घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार, दि.१२ रोजी दुपारी घडली.
महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची सभा मंगळवारी दुपारी १२ वाजता तेराव्या मजल्यावर उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्या दालनात आयोजिण्यात आली होती.
यावेळी समितीतील सदस्य पृथ्वीराज सोनवणे व राजीनामा दिलेले सदस्य नितीन नन्नवरे हे ११ वाजून ४५ मिनिटांपासून उपायुक्त तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खोसे यांच्या दालनाबाहेर आले होते. यावेळी खोसे यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे सदस्य बाहेर बसून होते.
यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक ५ डिसेंबर रोजी आयोजिण्यात आली होती. बैठकीस सदस्य १५ मिनिटे उशिरा आल्याने उपायुक्त खोसे यांनी ही सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी उपस्थित सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तर सभा असल्याने कामे सोडून मनपात आलेल्या मनसेचे नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी त्याच वेळी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा खोसे यांच्याकडे सुपूर्त केला होता. अन्य सदस्यांनीही नाराजी व्यक्त करून राजीनाम्याचा इशारा दिला होता.
मंगळवारी तिसºया वेळी ही तहकुब सभा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी अधिकारी उशिरा आले तर केवळ संजय पाटील हे एकच प्रभाग समिती अधिकारी उपस्थित होते.
उपायुक्त आल्यानंतर त्यांच्या दालनात सदस्य गेले. यावेळी नितीन नन्नवरे यांनी मी राजीनामा दिला असताना पुन्हा बैठकीचे निमंत्रण का दिले? अशी विचारणा करत त्यांनी बटाट्याची माळ उपायुक्त खोसेंच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. खोसे यांनी नन्नवरे यांचे दोन्ही हात पकडून त्यांना खाली बसण्याची सूचना केली. मात्र ते तेथून बाहेर निघून गेले.
धमकी दिल्याची तक्रार
यावेळी उपायुक्त खोसे हे आपल्याशी एकेरी भाषेत बोलले व ‘असे कृत्य महागात पडेल’ अशी धमकी दिल्याचे माहिती नितीन नन्नवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रशासन वृक्ष प्राधिकरणाच्या विषयांबाबत गंभीर नसल्यामुळेच आपण राजीनामा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.
नितीन नन्नवरे यांचे वर्तन योग्य नव्हते. तरीही आपण संयम सोडला नाही किंवा त्यांच्याशी एकेरीत बोललो नाही. त्यांचा समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार आपणास आहेत की नाही? याचा अहवाल मागविला असल्याने राजीनामा मंजूर झाला नाही. त्यामुळे त्यांना बैठकीचा निरोप देण्यात आला होता.
- चंद्रकांत खोसे, उपायुक्त.