जळगाव : करप्याला प्रतिकारक केळी वाणाचा शोध, दोन महिने आधीच होणार निसवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:42 AM2017-11-16T08:42:02+5:302017-11-16T08:42:09+5:30
अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे.
चुडामण बोरसे/जळगाव - अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे. करप्याला प्रतिकारक असलेले हे वाण कमी कालावधित तयार होत असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक मानले जाते. प्रति हेक्टरी उत्पादन वाढवायचे असल्यास सध्याचे खते वापरण्याचे प्रमाण व पद्धतीत बदल आवश्यक आहे. केळीसाठी पाण्याचे कार्यक्षम नियोजन ही यशस्वी केळी उत्पादनाची गुरुकिल्ली आहे.
जिल्ह्यातील सध्या असलेल्या केळी ही तापमान आणि अतिवृष्टी तसेच वादळाला बळी पडते. वादळी वारे आले की त्याचा पहिला फटका हा जणू केळीला बसत असतो.
यावर या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीचे एक नवीन वाण शोधून काढले आहे. बीआरएस सिलेक्शन २०१३-३ (बीआरएस म्हणजे बनाना रिसर्च स्टेशन) असे केळीच्या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या वाणाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. पुढील वर्षी संयुक्त कृषी संशोधन मंडळाच्या बैठकीत या नव्या वाणाला मान्यता दिली जाईल, अशी माहिती केळी संशोधन केंद्रातील उद्यानविद्यावेत्ता प्रा.एन.बी शेख यांनी दिली.
सन २०१३ पासून या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी या नव्या वाणाच्या केळीवर संशोधन सुरु केले. त्याला तब्बल चार वर्षांनी यश आले आहे. या नवीन बीआरएस वाणाची जळगावाच्याच केळी संशोधन केंद्र व इतर ठिकाणी साधारण केळीची २०० झाडे लावण्यात आली. त्यावर संशोधन सुरू झाले. ठिबकच्या साहाय्याने खते देण्यात आली. त्यात केळीच्या एका झाडाला २०० गॅ्रम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश अशी खते गरजेनुसार देण्यात आली. केळीच्या गुणधर्मात कुठलाही बदल होणार नाही, याची काळजी पहिल्यापासून घेण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदीर्घ अशा संशोधनातून नवीन वाण पुढे आले आहे. संशोधित केलेल्या नवीन केळीचे झाडांची उंची दीड मीटर आहे. या झाडाचे वजन २२ किलोपर्यंत आहे. विशेष म्हणजे हे झाड करपाही सहन करु शकते, अशी याची क्षमता आहे. आणि अतिशय अल्प अशा खर्चात केळी पिकविली जाऊ शकते. एका फणीला १३ ते १४ केळी लागली आहेत. ३२१ दिवसात येणाºया या केळीचा गोडवा नेहमीच्या केळीसारखाच आहे.
या संशोधनासाठी केळी संशोधन केंद्रातील प्रा.एन.बी.शेख यांच्यासह त्यांचे सहकारी व्ही.पी. भालेराव, प्रा. सुरेश परदेशी, वेदांतिका राजे निंबाळकर, अंजली मेढे, डॉ. राकेश सोनवणे यांनी सहकार्य केले.
सामान्य शेतक-याला हे वाण परवडेल, त्याला खर्च कमी लागेल आणि कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे वाण संशोधन करावे, असे गेल्या काही वर्षापासून मनात होते, त्याला यश आले आहे. पुढील वर्षी या वाणला मान्यता मिळेल, अशी अशा आहे.
- प्रा.एन.बी. शेख, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगाव