जळगाव जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:36 PM2019-09-19T12:36:08+5:302019-09-19T12:36:38+5:30
पावसाची सरासरी १०६ टक्क्यांवर
जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी पाचोरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले. जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार व सलग हजेरी लावल्याने जिल्ह्याची पावसाची सरासरी १०५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प मिळून एकूण जलसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीही भोकरबारी, मन्याड या मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के तर अग्नावती धरणात १.६३ टक्केच उपयुक्त साठा झाला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन-चार दिवसांचाच खंड वगळता पावसाने सातत्यपूर्ण व जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याने पावसाची शंभरी पार केली असून आतापर्यंत १०५.७ टक्के पाऊस झाला आहे.
११ तालुक्यात सरासरी शंभरीपार
जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १०० च्या पुढे गेली आहे. तर उर्वरीत ४ तालुक्यांपैकी चाळीसगाव वगळता अन्य तीन तालुक्यांची सरासरीही ९५ टक्क्यांच्या पुढेच असून परतीच्या पावसात या तालुक्यांमध्येही पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ९५.५ टक्के, धरणगाव ९५.४, तर भडगाव ९५.६ टक्के यांचा समावेश आहे.
सर्वात कमी चाळीसगावात तर सर्वाधिक रावेर तालुक्यात
चाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक १२८.९ म्हणजेच १२९ टक्के पाऊस रावेर तालुक्यात झाला आहे. जामनेर तालुक्यात १०७.४ टक्के, एरंडोल ११५.४, भुसावळ ११३.४, यावल ११८.१, मुक्ताईनगर १०६.५, बोदवड १०८.७, पाचोरा १०२.८, अमळनेर १०४.४, पारोळा १०४ तर चोपडा तालुक्यात १०६.५ टक्के पाऊस झाला आहे.
धरणांमध्ये एकूण ७९ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ७८.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच साठा जेमतेम ५२.३७ टक्के होता.
मोठ्या प्रकल्पांसोबत मध्यम प्रकल्पही समाधानकारक पाणीसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८६.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६०.२४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा हतनूरमध्ये ६१.१८ टक्के, गिरणात १०० टक्के तर वाघूर धरणात ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने उर्वरीत दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे.
दोन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही भोकरबारी व मन्याड धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अग्नावती धरणात १.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.