जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान अनुदानातील पहिल्या टप्प्याचे १०० टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:13 PM2019-12-04T23:13:12+5:302019-12-04T23:13:49+5:30
जळगाव : जिल्ह्यात अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शासनाने पहिल्या टप्प्यात दिलेल्या १७९ कोटींच्या निधीचे तालुक्यातील ...
जळगाव : जिल्ह्यात अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शासनाने पहिल्या टप्प्यात दिलेल्या १७९ कोटींच्या निधीचे तालुक्यातील २ लाख ५९ हजार ७२० शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९९.९१ टक्के निधीचे वाटप पूर्ण झाले आहे. त्यापैकी ११ तालुक्यात १०० टक्के वाटप झाले आहे.
जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी विभाग, महसूल व जि.प.ला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातही पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. तसेच या नुकसानी पोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत केला असून जिल्हा प्रशासनाने हा निधी तालुकानिहाय २८ टक्के प्रमाणे वितरीत केला आहे. त्याचे वाटप बँकांमार्फत सुरू आहे. मात्र निधी वितरीत केल्यानंतरही त्याचे वाटप धीम्यागतीने सुरू होते. जळगाव तालुक्यासह काही तालुक्यांमध्ये तर शून्य टक्के निधी वितरण झाले होते. याबाबत २८ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने या निधी वाटपला गती आली होती. त्यामुळे ९९.९१ टक्के म्हणजेच सुमारे १०० टक्के निधी वाटप पूर्ण झाले आहे.