जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:51 PM2019-08-27T12:51:16+5:302019-08-27T12:51:36+5:30
पावसाने आताच गाठली गतवर्षीची सरासरी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा मुक्काम दुसºया दिवशीही कायम आहे. सोमवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. जळगाव शहरातसह मंगळवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालेले नव्हते.
चाळीसगाव तालुक्यात सोमवारी दुपारी पाऊस सुरू झाला होता. जामनेरातही पाऊस सुरू असून रस्ते, शेतातून पाणी वाहून निघाले. चोपडा तालुक्यातही रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.
मागील वर्षी आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात सरासरी ७२.२ टक्के पाऊस झाला होता. ही सरासरी यंदा आॅगस्टचा एक आठवडाच बाकी असताना गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र चाळीसगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. सोमवारी पावसाने चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात हजेरी लावली. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात अद्यापही ६ गावांना ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
शासकीय पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. त्यानुसार गतवर्षी ३० सप्टेंबर अखेर सुमारे ६८ टक्के पाऊस झाला होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर खंड पडला होता. त्यानंतर आॅक्टोबरअखेरपर्यंत पडलेल्या पावसामुळे सरासरी ७२.२ टक्के झाली होती. मात्र यंदा आॅगस्टचा एक आठवडा बाकी असतानाच गत वर्षीची सप्टेंबरची सरासरी ओलांडली असून आॅक्टोबर अखेरच्या सरासरीचीही बरोबरी केली आहे.
मुक्ताईनगरची आघाडी
मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के पाऊस झाला आहे. तर १५ पैकी ९ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीची सत्तरी पार केली आहे. त्यात मुक्ताईनगरसह यावल ८५.१ टक्के, जामनेर ७८.७ टक्के, एरंडोल ७३.९ टक्के, भुसावळ ७७.९ टक्के, रावेर ७८.६ टक्के, बोदवड ७९ टक्के, पारोळा ७०.५, चोपडा तालुक्यात ७१.५ टक्के पाऊस झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यात ५३.१ टक्के पाऊस
चाळीसगाव तालुक्यात मात्र जिल्ह्यात सर्वात कमी ५३.१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील टँकर बंद झाले असले तरीही चाळीसगाव तालुक्यात मात्र अद्यापही ६ गावांना ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान जळगाव तालुक्यात ६७.६ टक्के, धरणगाव ६९.५ टक्के, पाचोरा ६८ टक्के, भडगाव ६३ टक्के, अमळनेर तालुक्यात ६५.९ टक्के पाऊस झाला आहे.
शहरात १० दिवसांनंतर पाऊस
जळगाव शहरात २३ जुलै पासून पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पावसाने दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने हजेरी लावली आहे. संततधार पावसानंतर दहा दिवसांचा खंड पावसाने दिला. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल व पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.