जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:56 AM2020-01-29T11:56:40+5:302020-01-29T11:57:25+5:30
विकास सोसयटी संचालकांना दिलासा, शेतकरी कर्जमाफी योजनेस बाधा येऊ नये म्हणून निर्णय
जळगाव : जिल्हा सहकारी बँकेची होऊ घातलेली निवडणूक आता तीन महिने पुढे ढकलली असून त्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामास विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मार्च नंतर शेतकरी कर्जमुक्त होतील आणि त्यामुळे सोसायट्यादेखील निरंक होतील व थकबाकीदार राहणार नाहीत. परिणामी विकासोचे सदस्य जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला असून त्यांना यामुळे एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.
जिल्हा बँकेची निवड प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२०पर्यंत जिल्ह्यातील विकास सोसायटींचे ठराव मागविण्यात आले आहेत. मात्र ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्य सरकारने घोषणा केली. त्यामुळे पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याने सहकार विभागाने जिल्हास्तरीय क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व त्यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सहभाग अपेक्षित आहे. यासाठी बहुतांश अधिकारी योजनेच्या अंमंलबजावणीत व्यस्त राहणाह आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला व तसे परिपत्रक २७ जानेवारी रोजी काढण्यात आले.
इच्छुकांचा मार्ग मोकळा
जर विकासो थकबाकीदार असेल तर त्या संस्थेच्या संचालकांचा ठराव करता येणार नाही. त्याऐवजी थकबाकीदार नसलेल्या सक्रीय सभासदाच्या नावाचा ठराव करता येणार आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या विकासोंच्या अनेक इच्छुक संचालकांचा पत्ता कट झाला होता. मात्र मार्चनंतर कर्जमाफीमुळे अनेक संस्था कर्जमुक्त होऊन ‘अ’ वर्गात जाणार आहेत. अशा संस्थांच्या संचालकांना त्यामुळे निवडणुक लढविणे शक्य होणार आहे. आता निवडणूकच तीन महिने पुढे ढकलल्याने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.