जळगाव जिल्हा बँक करणार २२५ कर्मचाऱ्यांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:41 PM2019-05-09T12:41:05+5:302019-05-09T12:41:37+5:30
२३ मे नंतर सुरु होणार प्रक्रिया
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत निर्णय होऊन त्यानुसार पहिल्या टप्प्यात २२५ जागा भरणार असल्याची माहिती बँकेचे संचालक तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपताच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता व इतर कारणांमुळे पाच महिन्यांनतर जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येऊन या विषयी माहिती देण्यासह बँकेच्या आर्थिक स्थितीचीही माहिती देण्यात आली. या वेळी एकनाथराव खडसे यांच्यासह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, रवींद्र पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, आमदार सुरेश भोळे, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
८०० जागा रिक्त
या वेळी माहिती देताना खडसे म्हणाले की, मनुष्यबळ कमी असतानाही बँक चांगले काम करीत असून बँकेने खर्चात मोठी बचत केली आहे. बँकेत सध्या ८०० जागा रिक्त असून मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यात पहिल्या टप्प्यात २२५ लिपीकाच्या जागा भरण्यात येणार असल्याचे खडसे म्हणाले.
चार कंपन्यांना निमंत्रण
भरती प्रक्रिया ही संपूर्ण आॅनलाईन राहणार असून या भरतीसाठी सहकार विभागाकडून चार कंपन्यांना बोलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात आयबीपीएस ही सरकारी कंपनी असून आतापर्यंत या कंपनीने रिझर्व्ह बँक, राज्य सहकारी बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांची भरती प्रक्रिया केली असल्याने या कंपनीला प्राधान्य राहणार असल्याचे खडसे म्हणाले.
२३ मेनंतर प्रक्रिया सुरू होणार
लोकसभा निवडणुकीचा २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर या भरती प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जाहिरात काढून पुढील सर्व प्रक्रिया पारदर्शक राहण्यावर भर राहणार असल्याचेही खडसे म्हणाले.
व्यवस्थापन खर्च आला २ टक्केच्या आत
बँकेने केलेल्या काटकसरीमुळे १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच व्यवस्थान खर्च हा २ टक्केच्या आत आल्याचा दावा या वेळी खडसे यांनी केला. यंदा हा खर्च केवळ १.९० टक्के झाला असून मोठी बचत झाल्याने बँकेच्या नफ्यातही वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.
ठेवींना विमा संरक्षण
३१ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बॅँकेस ५३ कोटी ७५ लाख रुपये ढोबळ नफा झाला असल्याचे या खडसे यांनी सांगितले. या सोबतच ३१ मार्च अखेर बॅँकेच्या सर्व प्रकारच्या एकूण ठेवी ३ हजार २६६ कोटी ३७ लाख रुपये झाल्या असून जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवीवर ‘डिपॉझीट इन्श्युरन्स क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन’कडून बॅँकेने पूर्ण विमा हप्ता भरणा केलेला आहे. गत वर्षाच्या तुलनेत ठेवीमध्ये २७९ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ झाल्याचे ते म्हणाले. बॅँकेच्या भाग भांडवलात आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बॅँकेचे एकूण भाग भांडवल १९२ कोटी ८७ लाख रुपये झाले असून बॅँकेने संपूर्ण आर्थिक वर्षात रिझर्व्ह बॅँक व नाबार्डने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा रोखता व तरलता जास्त राखलेली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
इतिहासात प्रथमच स्व-भांडवलातून कर्ज वाटप
बॅँकेच्या नेटवर्थमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ३१ मार्च अखेर बॅँकेचे नेटवर्थ १३१ कोटी ६७ लाख रुपये झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या १०० वर्षाच्या इतिहासात बॅँकेने प्रथमच स्व-भांडवलातून पीक कर्जासह संपूर्ण कर्जवाटप केले असल्याने मिळणारा सर्व लाभ थेट जिल्हा बँकेला झाला असल्याचे खडसे म्हणाले.
बँकेच्या सर्व शाखा आॅनलाईन
या सोबतच रिझर्व्ह बॅँकेने निश्चित केलेल्या धोरणानुसार बॅँकेने सीआरएआर ठेवलेला आहे. यावर्षात सीआरएआरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन १०.२४ टक्के झाला असून बॅँकेच्या सर्व शाखा सीबीएसने जोडल्या जाऊन संपूर्ण कामकाज संगणक प्रणालीद्वारे आॅनलाईन सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या सोबतच बॅँकेने विविध सुविधा सुरू केल्याचे खडसे म्हणाले.
नाबार्डकडून बॅँकेस अनुदान
कर्मचारी पगार खर्चात ६ कोटी ३५ लाख रुपयांनी घट झाल्याचे सांगत नाबार्डकडून बॅँकेस ४३ लाख ९२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचे सांगण्यात आले. बॅँकेचा एकूण व्यवसाय ५ हजार ७९ कोटी १२ लाख रुपये झालेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात बॅँकेच्या व्यवसायात मोठी वाढ झाली असल्याचे खडसे म्हणाले.
कार्डधारकांना एक लाखाचा विमा
रुपे डेबीट कार्ड व रुपे किसान क्रेडिट कार्ड धारकांना नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंडिया व न्यू इंडिया इन्शरन्स कंपनी सोबत करार करून सदर विमा योजने अंतर्गत कार्डधारकांना १ लाख रुपयांचा वैयक्तीक अपघात विमा लागू असून गतवर्षात शेतऱ्यांना या योजने अंतर्गत प्रत्येकी रुपये एक लाख विमा भरपाई मिळालेली आहे.
एटीएमद्वारे व्यवहार करण्यात प्रथम क्रमांक
महाराष्टÑ व गुजरात राज्यामध्ये जिल्हा बॅँकांमार्फत एटीएम कार्डद्वारे सर्वात जास्त व्यवहार करणारी बॅँक म्हणून जळगाव जिल्हा बँकेस गौरवण्यात आले असून बॅँकेने यामध्ये देशातून ५० वा क्रमांक मिळविला आहे तर महाराष्टÑामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे खडसे यांनी सांगितले.