जळगाव जिल्हा बँकेच्या 50 शाखांचे व्यवहार होते ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:43 PM2017-08-31T22:43:47+5:302017-08-31T22:52:37+5:30
ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने धरणगावातील जिल्हा बँक शाखांनाही फटका बसून आर्थिक व्यवहार प्रभावीत झाले.
लोकमत ऑनलाईन धरणगाव : शहर व तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांसह जिल्ह्यातील एकूण 50 शाखांची ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने 28 पासून या शाखांमधील व्यवहार ठप्प झाले होते. ही यंत्रणा दूरसंचार खात्याच्या अडचणीमुळे बंद झाल्याचा आरोप जिल्हा बँकेच्या संगणक विभागाने केला आहे. तर दूरसंचार खात्याने फक्त 24 तास तांत्रिक अडचण आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तीन दिवस कुणाच्या चुकीमुळे व्यवहार ठप्प राहिले, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न खातेदारांनी उपस्थित केला आहे. जिल्हा बँक व दूरसंचार खात्याच्या या टोलवाटोलवीमुळे ग्राहक संभ्रमात पडला आहे. दरम्यान, 31 रोजी दुपारून बँकेची ऑनलाईन यंत्रणा सुरू झाल्याची माहिती धरणगाव शाखेने दिली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण 256 शाखा आहेत. या सर्व शाखांना ऑनलाईन करण्यासाठी बँकेच्या पदाधिकारी व अधिका:यांनी अथक परिश्रम घेतले व ही यंत्रणा यशस्वी केली. मात्र मध्ये- मध्ये ही यंत्रणा बंद पडत असल्याने खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. 28 पासून ऑनलाईन यंत्रणा बंद धरणगावसह जिल्ह्यातील 50 जिल्हा बँकेच्या शाखांची ऑनलाईन यंत्रणा बंद झाल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. याचे कारण जिल्हा बँकेला विचारले असता दूरसंचार खात्याची एससीजी कार्डची समस्या उद्भवल्याने ही यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे दूरसंचार खात्याने आमची अडचण फक्त 24 तास होती. ती दूर झाल्याबरोबर यंत्रणा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मग यंत्रणा कुणाच्या चुकीमुळे तीन दिवस बंद होती. व कुणामुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागला. याचा शोध लावण्याची गरज असल्याचे मत खातेदारांनी व्यक्त केले आहे. धरणगावची शाखा गुरूवारी सुरळीत धरणगावसह तालुक्यातील पिंप्री, साळवा, सोनवद येथील जिल्हा बँक शाखेतील व्यवहार दि.28 पासून ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने ठप्प झाले होते. त्यामुळे नोकरवर्ग, शेतकरी व इतर खातेदारांना अडचणीचे ठरत होते. मात्र दि.31 च्या दुपारपासून ऑनलाईन यंत्रणा सुरू झाल्याने व्यवहार सुरळीत झाल्याचे शाखाधिका:यांनी सांगितले. दूरसंचार खात्याला वर्षाकाठी 70 लाख ऑनलाईन यंत्रणा जिल्हा बँकेने सुरू केल्यानंतर दरवर्षाला या यंत्रणेसाठी 70 लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संगणक शाखेने देऊन दूरसंचार खात्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.