जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ; शिवाजीराव गर्जे यांची कारवाई
By विलास.बारी | Published: May 17, 2023 07:04 PM2023-05-17T19:04:30+5:302023-05-17T19:04:39+5:30
पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा.
जळगाव : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करीत अध्यक्ष झालेले संजय पवार यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षातून बडतर्फ केले आहे. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित असल्याचे बॅनर्स व पोस्टर्स लावले होते. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी-संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीमध्ये असा कोणताही गट नसल्याचे सांगत पोस्टर्स व बॅनर्स काढण्याची सुचना केली होती.
मात्र संजय पवार यांच्याकडून लेखी खुलासा किंवा कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे कारण देत सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवार १६ मे पासून संजय पवार यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र पाठविले आहे. तसेच यापुढे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नये अशी तंबी देत तसे केल्यास आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या पत्राची पत्र संजय पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना पाठविण्यात आली आहे.