निराधारांची दिवाळी! जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब; गरजूंना केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 02:35 PM2021-11-05T14:35:12+5:302021-11-05T14:36:54+5:30
Jalgaon News : बेघर, निराधारांना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली.
जळगाव - एकीकडे फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत असताना दुसरीकडे रस्त्यावर भुकेल्यापोटी थंडीत कुडकुडणाऱ्यांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे सर्वत्र चित्र असते. जळगावातही अशीच स्थिती असताना रस्त्यावर कशाचा तरी आडोसा घेऊन झोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेघर, निराधारांना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली. कोणताही बडेजावपणा न करताना जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नीने अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने निराधारांचेही डोळे पाणावले व त्यांनी या दांपत्यास दोन्ही हाताने आशीर्वाद दिले.
दिवाळी म्हटली म्हणजे नवीन कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे फराळ, घरांवर आकर्षक रोषणाई, सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी असे पाहावयास मिळते. मात्र ज्यांना घरच नाही व उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, अशा बेघर निराधारांची दिवाळी अंधारातच जाते. असेच चित्र जळगाव रेल्वे स्थानक परिसर व इतर ठिकाणीही अजूनही कायम आहे. यंदाच्या दिवाळीला देखील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर बसून किंवा झोपून रात्र काढणार्यांना दिवाळीत ना पोटभर जेवण मिळाले, ना एक पणती लावू शकले. नवीन कपडे तर स्वप्नच. मात्र रात्री अचानक एक दांपत्य त्यांच्यासाठी देवदूत म्हणून आले व या निराधारांना भर थंडीत मोठा आधार मिळाला.
देवदूत दांपत्य म्हणजे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. अनुराधा राऊत हे दांपत्य. त्यांनी कोणालाही न सांगता गुप्तदानाच्या हिशोबाने गरजूंना मदत करण्यासाठी ते दिवाळीच्या रात्री बाहेर पडले. यादरम्यान त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जवळपास ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल, आधार म्हणून खाद्यपदार्थ, बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे विविध साहित्य देऊन भर थंडीत मायेची ऊब दिली.
निराधारांचे पाणावले डोळे
एका ठिकाणी आपले खाजगी वाहन लावून हे साहित्य हातात घेत पायी फिरत या दाम्पत्याने गरजूंना मदत केली. दिवाळीच्या रात्री अचानकपणे पोटाला आधार व थंडीपासून बचाव करणारे कपडे मिळाल्याने निराधारांचे डोळे पाणावले. या मदतीने भारावलेल्या बेघर, निराधारांनी या दांपत्यास दोन्ही हाताने आशीर्वाद देत दीर्घायुष्याची प्रार्थना केली.
महापालिकेच्या निवारा केंद्रात हलविण्याच्या तात्काळ हालचाली
बेघर निराधारांचे हे हाल पाहून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय जबाबदारी देखील सांभाळत या निराधारांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याच्या हालचाली तात्काळ सुरू केल्या. यंदा थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याने ही सर्व मंडळी यातून सुरक्षित राहावे म्हणून त्यांना लवकरात लवकर निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सुरुवातीपासूनच प्रत्येक दिवाळीला मदत
जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे कधीपासूनच दिवाळीच्या वेळी व इतर वेळीदेखील निराधारांना मदत करीत असतात. यापूर्वी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानादेखील त्यांनी हे कार्य केले. जळगावातदेखील ते सुरूच आहे. मात्र याविषयी ते कोणाला सांगत नाही. असे असले तरी यंदा मात्र दिवाळीच्या रात्री ते काही जणांच्या नजरेस पडले व ही बाब समोर आली. अन्यथा या गुप्तदानाविषयी ते कोणताही बडेजावपणा न करता मदत करीत असतात.
चमकोगिरीला धडा
कोणाला मदत करायची असली तर अनेक जण मोठा फौजफाटा घेऊन व कॅमेरे घेऊन फोटोसेशन करीत मदत करतात. मात्र जिल्हाधिकारी सारखा व्यक्ती कोणताही मोठेपणा न करता गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंना मदत करीत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे जळगावात आले तेव्हापासून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून कोरोना काळातदेखील रात्री व इतर कोणत्याही वेळी रुग्णालयांची स्थिती पाहण्यासाठी ते अचानक भेट द्यायचे अथवा ग्रामीण भागात जाऊन अचानक पाहणी करतात. काही त्रुटी आढळल्यास यंत्रणेला थेट धारेवर न धरता एक संधी देत सुधारणा करण्याच्या सूचना देतात. त्यांच्या या वेगळ्या कार्यशैलीमुळे आज जळगावात कोरोना देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला आहे.
बेघर, निराधारांना आधार मिळावा, त्यांची दिवाळी सुखद व्हावी व थंडीपासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी सुरुवातीपासून त्यांना मदत करीत आहे. यावेळी मात्र काही जणांना ते समजले. आज रस्त्यावर जे आहेत त्यांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार असून तशा सूचना दिल्या आहेत.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.