...अन् जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 06:49 PM2023-09-22T18:49:20+5:302023-09-22T18:50:23+5:30
शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती.
कुंदन पाटील
जळगाव : महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वीच संपूर्ण प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे २२०० प्रकरणांना २१ दिवसांनी सुनावणी घेऊ, असे सांगत दालनाबाहेर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सामोरे गेले. गतकाळात काय झाले, याची जाणीव आहे. मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिेजे. दलालांना नको. म्हणून बाजू मांडण्यासाठी वकील लावा पण ‘एजंट’ नको, अशा सूचक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती. जिल्ह्यातील २२०० प्रकरणांवर सुनावणी होणार असताना शेतकऱ्यांच्यावतीने वकिलांनी बाजू मांडली.न्यायालयीन निवाड्यानुसार सुनावणी सुरु ठेवावी, अशी विनंती वकिलांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर होत नाही तोपर्यंत सुनावणीत वेळ खर्ची करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. त्यावर वकिलांनी वेळ मागितली. १५ दिवसात प्रतिज्ञापत्र व दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर वकिलांनी हा कालावधी अपूर्ण पडेल म्हणत सुनावणीचा कालावधी वाढवून मिळावी, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसानंतर सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही....
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दालनाबाहेर पडले. तेव्हा त्यांना व्हरांड्यात शेतकऱ्यांची गर्दी दिसली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ‘दलाली’चे कान पिळण्यासाठी त्यांनी रोखठोक सल्लाच देऊन टाकला. ‘गतकाळात काय झाले आहे, हे मला माहिती आहे. शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळत नाही. मात्र ‘एजंट’ वेळ मारुन नेतात. म्हणून सुनावणीदरम्यान, वकील लावा पण ‘एजंट’ लावू नका, अशा शब्दात सूचक इशारा दिला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांविषयी अडचणी येत असल्याची तक्रार मांडली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वकील लावता येत नसेल माझ्याकडे या. मी सहकाऱ्यांकरवी तुमचे कागदपत्र तयार करुन देतो.दस्ताऐवजातील पूर्तताही करुन देतो.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाला मी कागदपत्रे पुरवायला तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुठले कागदपत्र दिले, तेही देतो. संपूर्ण पारदर्शकताही जपायला तयार आहे. मात्र मला कुणाचा फोन आणू नका. जेव्हा मोबदल्याचा पूर्ण असलेला दस्ताऐवज सादर केला की अंतिम सुनावणी घेईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करेल, अशा शब्दही त्यांनी यावेळी दिला.