५ प्रांत, ११ तहसीलदारांची वेतनवाढ जळगाव जिल्हाधिकाºयांनी रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 10:29 PM2017-10-27T22:29:57+5:302017-10-27T22:32:32+5:30
सातबारा संगणकीकरणात हलगर्जीपणा भोवला
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.२७- सातबारा संगणकीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने ५ प्रांताधिकारी व ११ तहसीलदारांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यापैकी जळगाव प्रांताधिकाºयांची वेतनवाढ रोखण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता फाईल जुनी आहे. माहिती घ्यावी लागेल, असे सांगत या विषयावर बोलणे टाळले.
१४ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी संगणकीकरण पूर्ण झालेल्या गावांची संख्या ३९ असताना महिनाभरानंतर ती केवळ ९५ पर्यंतच गेली. दोन महिन्यात जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचे सातबारा संगणकीकरण पूर्ण करण्याचा मानस होता. त्यापैकी एक महिना उलटून गेला. मात्र या कामात प्रगती झालेली नसल्याने राज्यात जिल्ह्याची क्रमवारी ३२वरून घसरून ३३वर गेली. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी १९ सप्टेंबर रोजी याबाबत आढावा घेतला. त्यात संगणकीकरण पूर्ण झालेल्या गावांची संख्या ३९ वरून केवळ ९५ पर्यंतच पोहोचल्याचे आढळून आले. त्यापैकी केवळ चोपडा व यावल तहसीलदारांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी जळगाव, अमळनेर, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ व फैजपूर येथील प्रांताधिकाºयांना तर जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर येथील १३ तहसीलदारांना नोटीस बजावली व कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्याचे सातबारा संगणकीकरणाचे केवळ १२ टक्केच काम पूर्ण झालेले असल्याने जिल्हाधिकाºयांनी या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापैकी पाचोरा प्रांताधिकारी प्रभारी असल्याने व फैजपूरला प्रांताधिकारी नसल्याने त्यांना वगळण्यात आले. तर नोटीस दिलेल्या १३ तहसीलदारांपैकी मुक्ताईनगर, बोदवड या तहसीलदारांना वगळण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
------
यांची एक वेतनवाढ रोखली
प्रांताधिकारी- जळगाव, अमळनेर, एरंडोल,चाळीसगाव, भुसावळ. (यापैकी जळगाव प्रांताधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे समजते.)
तहसीलदार- जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव, भुसावळ, रावेर