जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:56 PM2020-06-25T12:56:31+5:302020-06-25T12:57:10+5:30

दिवसभरात ११३ रुग्ण झाले बरे

In Jalgaon district, the cure rate has reached 61 percent | जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर

Next

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी २३ जून रोजी ११३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचेही कौतुक केले आहे.
कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून ९२ वर्षीय आजीचा समावेश तर आहेच शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रूग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रुग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत असल्याने व नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ७८ कोविड केअर सेंटर ३६ कोविड हेल्थ सेंटर तर २४ कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित २५८९ रुग्णांपैकी आतापर्यंत १५७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
तालुकनिहाय कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
जळगाव शहर- २८०, जळगाव ग्रामीण- ३३, भुसावळ- २३४, अमळनेर- १९६, चोपडा-१३१, पाचोरा-४०, भडगाव- ८२, धरणगाव- ६५, यावल -७३, एरंडोल- ४४, जामनेर-७८, रावेर-१२०, पारोळा- ८८, चाळीसगाव- १७, मुक्ताईनगर -१३, बोदवड -११, इतर जिल्ह्यातील- ३, जळगाव जिल्ह्यातील इतर जिल्ह्यांमधील रुग्ण - ६८ याप्रमाणे एकूण १५७६ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी इन्सिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, महसूल, पोलीस दलाचे कर्मचारी परिश्रम घेत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण कोरोनामुक्त होत आहे.
असे असले तरी नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी, लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर राखावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

Web Title: In Jalgaon district, the cure rate has reached 61 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव