जळगाव जिल्ह्यात पाऊस कमी असतानाही सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:29 PM2018-09-16T12:29:33+5:302018-09-16T12:29:45+5:30
दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकता
जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची नजर पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यात ६२.८ टक्केच पाऊस झाला असताना जिल्ह्यातील एकाही गावाची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत नसून सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळा झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकता
पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याने दुष्काळी योजनांचा जो लाभ मिळतो, तो मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ८३.८ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मात्र भुसावळ तालुक्यात ५० टक्केही पाऊस नसताना (४९.७ टक्के) या तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांच्यावर घोषित करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ५२.७, यावल तालुक्यात ५२.८, भडगाव तालुक्यात ५७.४ टक्के पाऊस असताना तेथेही अशीच पैसेवारी जाहीर केली आहे.
तालुका व कंसात पावसाची टक्केवारी - जळगाव (५९.२), जामनेर (५९.६), एरंडोल (८३.८), धरणगाव (७९.८), भुसावळ (४९.७), यावल (५२.८), रावेर (६४.९), मुक्ताईनगर (५२.७), बोदवड (६४.९), पाचोरा (६१.२), चाळीसगाव (६२.२), भडगाव (५७.४), अमळनेर (५५.९), पारोळा (७५.७), चोपडा (६२.२).