जळगाव जिल्ह्यात १६० गावांना टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:25 PM2019-04-30T12:25:48+5:302019-04-30T12:26:17+5:30
पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भिती
जळगाव : जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल महिना संपत आला असताना जिल्ह्यातील तब्बल १६० गावांना १४६ टँकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून ही समस्या अधिक तीव्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा २१० गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
२५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील २५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ४७ गावे जामनेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर तालुक्यातील ३४, धरणगाव तालुक्यातील ३५, एरंडोल १७, मुक्ताईनगर २६, पाचोरा २७, चाळीसगाव १७ तर पारोळा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ४६ गावांमध्ये ४३ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना केल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात सर्वाधिक गावे
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून सध्या तब्बल ४७ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातीलच २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारोळा तालुक्यात २७ गावांना २२ टँकर, चाळीसगाव २६ गावांना २९ टँकर, पाचोरा १२ गावांना १२ टँकर तर जळगाव तालुक्यात २, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ गावला, भुसावळ तालुक्यातील ३, बोदवड ५, भडगाव तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.