जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये गत पाच वर्षातील सर्वात कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:59 PM2019-07-02T12:59:37+5:302019-07-02T13:00:09+5:30
सरासरी ७१ मिमी पावसाची नोंद
जळगाव : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली.जिल्ह्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी म्हणजे सरासरी ७१ मिमी तोही जेमतेम ९ दिवस पाऊस झाला आहे. मात्र तरीही धरणसाठ्यात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली असून पेरण्याही ४० टक्क्यांहून अधिक आटोपल्या आहेत. मात्र अद्यापही चोपडा तालुका व जिल्ह्यातील काही भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही.
जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी १३० मिमी आहे. २०१५ मध्ये जून महिन्यात ११ दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यात सरासरी ११४.१ मिमी पाऊस झाला होता. तर २०१६ मध्ये ७ दिवसांत ९१.८ मिमी, २०१७ मध्ये ११ दिवसांत १०७ मिमी तर २०१८ मध्ये जून महिन्यात १३ दिवसांत ११५.२ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा उशीराने हजेरी लावलेल्या पावसाने जून महिन्यात जिल्ह्यात ९ दिवस हजेरी लावली. त्यात सरासरी ७१ मिमी पाऊस झाला आहे.
चार तालुके तहानलेलेच
जिल्ह्यात उशीराने का होईना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र चोपडा, पारोळा, अमळनेर व भडगाव हे चार तालुके अद्यापही तहानलेलेच आहेत. या चारही तालुक्यांची पावसाची सरासरी जून महिना संपला तरीही ५० मिमीपेक्षा कमीच आहे. चोपड्यात ३६.५, पारोळा ४६, अमळनेर ३६.१ तर भडगाव तालुक्यात ४३.२ मिमी पाऊस झाला आहे.
धरणसाठ्यात हळूहळू होतेय वाढ
जिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र तरीही गिरणा व वाघूर धरणात पाण्याची थोडीफार आवक सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी चांगली लावल्याने गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून शून्य टक्क्यांवर असलेला उपयुक्त पाणीसाठा ७.५ टक्क्यांवर आला आहे. तर वाघूरचा उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आला आहे.
४० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या
पावसाने उशीरा हजेरी लावल्याने पेरण्यांनाही उशीरा सुरूवात झाली. तर अद्यापही काही भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र तरीही ४० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र जाणकारांच्यामते ६० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. अद्याप कृषी विभागाकडे त्याची आकडेवारी आलेली नाही.
ज्वारीच्या क्षेत्रात यंदा १० पट वाढ
यंदा पूर्वहंगामी लागवडीचे क्षेत्र ७५ हजार वरून १० हजार हेक्टरवर आले. तसेच कपाशीच्या पेरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात दरवर्षीपेक्षा फार वाढ होणार नसल्याचे चित्र आहे. त्यातही राशी ६५९ या नवीन वाणाचा पेरा प्रचंड वाढला आहे. कापसाची जेवढी लागवड झाली आहे, त्यातील निम्मे क्षेत्र हे या राशी ६५९ चेच आहे. मागच्यावर्षी ज्वारीला भाव चांगला मिळाला.
तसेच मक्यावर कीड अधिक पडले. त्यामुळे यंदा ज्वारीकडे ओढा वाढला असून ज्वारीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १० पट वाढले आहे. तर मक्याचे क्षेत्र तसेच सोयाबीनचे क्षेत्रही कमी झाले आहे. उडीद-मूगाचे क्षेत्रही घटले आहे.
टंचाईला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
शासनाच्या स्थायी आदेशानुसार ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. तथापी अद्यापही जिल्ह्यातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरण व तलावांमधील अत्यल्प पाणीसाठा विचारात घेऊन तहसीलदारांनी टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या टंचाई उपाययोजनांना ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
४१ गावांचे ४० टँकर झाले कमी
जिल्ह्यात २४९ गावांना २२१ टँकरने पाणीपुुरवठा सुरू होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने काही भागात परिस्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ४१ गावांचे ४० टँकर कमी झाले आहेत.