जळगाव जिल्ह्यात १८ दिवसांपासून पावसाने मारली दडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:41 AM2018-09-11T11:41:22+5:302018-09-11T11:42:29+5:30
पावसाळा संपण्यास उरले २० दिवस
जळगाव : पावसाळा संपण्यास जेमतेम २० दिवसांचा कालावधी उरलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १८ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र ५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के तर एका प्रकल्पात जेमतेम ४ .९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे.
२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २३ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १ सप्टेंबरपासून तर एक थेंबही पाऊस झालेला नाही. तब्बल १८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने मूग, उडीद पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पन्नात १० ते २० टक्के घट आली होती. आता पुन्हा १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने उत्पन्नात घट घेणार आहे. तर ज्वारी, बाजरी ही पिकेही दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. उत्पन्नात किमान २५-३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापूस बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या पोषणासाठी पावसाची गरज होती. मात्र पावसाने दडी मारल्याने कपाशीवर रस शोषण किडीचा, फुलकिडे, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुभार्व कपाशीच्या सर्वच क्षेत्रावर आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आहे.
दरवर्षी पोळ्याला पावसाची हजेरी असते. मात्र यंदा पोळाही कोरडा गेला. त्यामुळे गणरायासोबत तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी आस बळीराजाला लागली आहे.
१७ गावांना १३ टँकर सुरूच
जिल्ह्यात अजूनही १७ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १, चाळीसगाव तालुक्यातील ५ व अमळनेर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. याखेरीज २७ गावांना अधिग्रहित केलेल्या ३३ विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे, हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या धरणांमध्ये एकूण ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात हतनूर ९७.०२ टक्के भरले असून गिरणा धरणात ४८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा फारच कमी आहे. तर जळगाव शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वाघूर धरणात जेमतेम ४६.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ६५.०८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा
१३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी या तीन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी व मन्याड या पाच प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे.
खान्देशात १६ सप्टेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पडला तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून मात्र खान्देशात पावसाला सुरुवात होईल.
-के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.