जळगाव जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला दाखल होतात अपघाताचे ३५० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:04 PM2019-07-18T12:04:22+5:302019-07-18T12:04:52+5:30
फ्रॅक्चरचे प्रमाण अधिक
जळगाव : जिल्ह्यातील रस्ते अपघातात रोज १० ते १५ तर महिन्याला ३५० च्या जवळपास रुग्ण जखमी होत असतात. पर्यायाने ते जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात. खासगी रुग्णालयांमधील संख्यादेखील जवळपास सारखीच आहे. साधारण एकट्या शहरातील रुग्णालयात अपघाताचे एक हजाराच्या जवळपास रुग्ण महिनाभरात दाखल होत असतात.
जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण हे संपूर्ण जिल्ह्यातील असले तरी जवळपासचे गावे तसेच शहरातील महामार्गावरील अपघाताचेच अधिक असतात. यात डोक्याला मार लागणे, हाता-पायाला खरचटणे व फ्रॅक्चर अशा स्वरुपाचे रुग्ण जास्त आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वच प्रमुख रस्त्यांचे कामे सुरु असल्याने त्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
दुचाकी घसरुन जखमी होण्याच्या सर्वाधिक घटना आहेत. यात विशेष म्हणजे दाम्पत्यांची संख्या देखील मोठी आहे. जिल्हा रुग्णालयात रविवारी व शनिवारी अपघाताचे रुग्ण जास्त येत असल्याची माहिती अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात बुधवारी दुपारी २ ते ४ या दोन तासात रस्ता अपघाताचे २ रुग्ण तर हाणामारीचे ७ व सर्पदंशाचे २ व इतर ३ असे १४ रुग्ण दाखल झाले होते. दिवसाला एकूण ५०० रुग्ण दाखल होतात, त्यापैकी किमान १५ रुग्ण अपघाताचे असतात. सर्पदंश, श्वान दंश, विषबाधा तसेच प्राण्यांचा हल्ला अशा स्वरुपाचे रुग्ण दुपारनंतर दाखल होत असल्याची माहिती केस पेपर विभागातून मिळाली.
खासगी रुग्णालयात ५ टक्कयांनी रुग्ण वाढले
गेल्या काही महिन्यापासून खासगी रुग्णालयात अपघाताचे रुग्ण येण्याच्या संख्येत ३ ते ५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती मालती हॉस्पिटलचे आर्थोपेडीक डॉ.प्रताप जाधव यांनी दिली. जामनेर, अमळनेर, एरंडोल या भागातील रुग्ण शाहू नगरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात. हात व पाय फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती डॉ.राजेश पाटील यांनी दिली. महिन्याला १५० च्या जवळपास रुग्ण अपघाताचे येत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातच होतात शस्त्रक्रिया
आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या गरीब रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. महिन्याला अपघाताच्या किमान ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. काही रुग्ण प्राथमिक उपचारानंतर खासगी दवाखान्यात जातात. इतर तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलविले जातात, अशा रुग्णांची संख्या महिन्याला १५० च्याजवळपास आहे.