जळगाव जिल्हा रुग्णालय बनले निराधार महिलेचे आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:26 PM2017-09-02T12:26:45+5:302017-09-02T12:29:23+5:30
मायेची ऊब : दोन महिन्यांपासून संभाळ करीत असलेल्या महिलेला पूत्ररत्न
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - भुसावळ येथे सापडलेल्या निराधार गर्भवती महिलेचा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयाच्यावतीने संभाळ करण्यात येऊन तिला मायेची ऊब दिली. कोणीही नातेवाईक न आलेल्या या महिलेला पूत्ररत्न झाल्याने येथील कर्मचा:यांनी आनंद व्यक्त केला.
भुसावळ येथे मंद बुद्धी असलेली एक 40 वर्षीय गर्भवती महिला बेवारस अवस्थेत आढळून आली होती. त्या वेळी तिला तेथील महिला दक्षता समितीच्यावतीने 6 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा पासून ही महिला जिल्हा रुग्णालयातच होती.
मध्यंतरी या महिलेने जिल्हा रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची वेळीच अधिकारी, कर्मचा:यांनी लक्ष देऊन तिला न जाऊ देता, तिचा कोणताही कंटाळा न करता तिचा व्यवस्थित संभाळ केला. त्यानंतर तिला येथे मायेची ऊब मिळाल्याने तिचेही येथे मन रमले.
31 ऑगस्ट रोजी त्या महिलेला मुलगा झाला. अडीच किलो वजनाच्या या बाळ व बाळंतीनची प्रकृती उत्तम आहे. आपल्या संभाळामुळे एक बेवारस महिला सुखरुपरित्या प्रसूत झाल्याने त्याचे मोठे समाधान व आनंद असल्याचे येथील कर्मचा:यांनी सांगितले.
या महिलेच्या काळजी व प्रसूतीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता भोळे, डॉ. रेणुका भंगाळे, डॉ. कैलास पाटील, डॉ. संदीप पाटील, प्रसूती कक्षाच्या प्रमुख विमल चौधरी, लता देशमुख तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात कक्षातील परिचारिका, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यासाठी प्रमोद झवर यांनी वेळोवेळी या महिलेला आवश्यक मदत केली.
जिल्हा रुग्णालयात येणा:या प्रत्येक रुग्णांची आम्ही संपूर्ण काळजी घेत असतो. त्यात ही महिला बेवारस असल्याने सर्व अधिकारी, कर्मचा:यांनी तिची विशेष काळजी घेतली.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.