जळगाव जिल्हा रुग्णालयात नवीन निवासस्थानासह सुपर स्पेशालेटी हॉस्पिटलला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:33 PM2017-11-25T12:33:40+5:302017-11-25T12:36:23+5:30
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25 - जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार कमी जागेत जास्त निवासस्थाने उभारण्यात येणार असून उर्वरित जागेत शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच महिला व बाल रुग्णालय उभारण्यास प्राधान्य राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान येथील एकूण 89 निवासस्थांपैकी 80 निवासस्थाने रिकामी करण्यात आली असून उर्वरित 9 निवास्थाने अनधिकृत आहे, तीदेखील लवकरच रिकामी केली जातील, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.
येथील निवासस्थानांचे 1939 साली बांधकाम करण्यात आले असून ते जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते पाडून नवीन निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात येथील रहिवाशांना पहिली नोटीस मिळाल्यानंतर 30 ते 40 टक्के रहिवाशांनी निवासस्थान खाली केली होती.
जिल्हा रुग्णालयाच्या एकूण 12 एकर जागेपैकी 6 एकर जागेत निवासस्थानेच असून यासाठी जागा जास्त व्यापली गेली आहे. या ठिकाणी 60 टक्के रहिवासी निवृत्त झालेले तर कोणाची बदली होऊनही निवासस्थान खाली न केलेले होते. त्यामुळे त्यांना तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवासस्थान खाली करण्यास गती आली व 80 निवासस्थाने रिकामी करण्यात आले. आता केवळ 9 निवासस्थानेच रिकामे करणे बाकी असून ते अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले. 26 नोव्हेंबर्पयत ते निवासस्थाने खाली करण्याची मुदत दिली असून मुदतीत ते खाली झाले नाही तर पोलीस व मनपाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कमी जागेत जास्त घर
निवासस्थानामध्येच निम्मी जागा व्यापली गेल्याने रुग्णालयासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार निवासस्थान उभारण्यात येणार असून पद, वर्गानुसार वन बीएचके पासून पुढे फ्लॅट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उर्वरित जागेत विविध सुपर स्पेशालेटी हॉस्पिटल
नवीन निवासस्थाने दोन ते अडीच एकर जागेत बांधण्यात येऊन उर्वरित जागेत सुपर स्पेशालेटी हॉस्पिटल उभारण्याचा विचार असल्याचे डॉ. चव्हाण म्हणाले. या ठिकाणी कर्करोग, किडनी बदल, ह्रदय शस्त्रक्रिया या सारख्या आजारांवर उपचार उपलब्ध करून देत तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महिला व बाल रुग्णालय, वेअर हाऊसचाही प्रस्ताव पाठविणार
शहराच्या मध्यवर्ती भागात महिला व बाल रुग्णालय असावे म्हणून निवासस्थानांची उभारणी झाल्यानंतर असे रुग्णालय तसेच वेअर हाऊस उभारण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात येईल, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.
या सोबतच जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज सिस्टीम खराब झाली असून त्याचेही काम करण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण म्हणाले.