जळगाव जिल्ह्यात १४ दिवसात वाढले १४ टॅँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:31 PM2019-04-21T12:31:35+5:302019-04-21T12:32:04+5:30
निवडणूक, सुट्यांमुळे योजनांचे काम रखडले
जळगाव : यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होतांनाचे चित्र आहे़ गेल्या दोन आठवड्यात जिल्हाभरात टँकरची संख्या १४ ने वाढली आहे़ सध्या जिल्ह्यात १४७ गावांमध्ये १३४ टँकर सुरू आहेत़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून ही माहिती मिळाली़ आठवड्याला सरासरी पाच टँकर वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यातच निवडणुका व सलगच्या सुट्या यामुळे दररोज अपडेट होणारी ही आकडेवारीही खोळंबली आहे़ आचारसंहितेमुळे योजना रखडल्या असल्याने टंचाईने अनेक गावांची होरपळ होत आहे़
महत्त्वाच्या विभागात शूकशुकाट
पाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा व लघूसिंचन या विभागाकडे महत्त््वाच्या जबाबदाऱ्या असतात़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागात रंगरंगोटीचे काम सुरू आहे़ शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास या विभागात सात कर्मचारी उपस्थित होते़ तर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात स्वच्छतेचे काम सुरू होते़ याव्यतिरिक्त लघूसिंचनच्या कार्यालयात शूकशुकाट होता़ दोन दिवस सुट्या त्यात निवडणुकीच्या ड्युट्या या सर्वांमुळे जिल्हाभरातील टँकरची आकडेवारी अपडेट करण्याचे काम रखडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़ तालुकास्तरावरून आढावा घेऊन किती गावांमध्ये किती टँकर सुरू आहे, याची आकडेवारी या विभागाकडून घेतली जाते़ मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या टँकरची सध्यास्थिती काय याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे़
जिल्हा परिषदेत आता विरोधकच नाही
जिल्हाभरात पाण्याचा विषय अतिशय गंभीर असताना राजकीय पदाधिकारीही याबाबतीत पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र आहे़ आचारसंहिता लागताच उमेदवार घोषित होताच पदाधिकारी प्रचारात गुंतले़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या सहकार्याने भाजपची सत्ता आहे़ शिवसेना विरोधात आहे, मात्र, लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा झाली व शिवसेनेला जिपच्या सत्तेत वाटा मिळेल अशी, आशा निर्माण झाली़ समाननिधी असो किंवा सभा तहकूब होण्याचा विषय असो आक्रमक भूमिका मांडणाºया शिवसेनेनेही आता भाजपची बाजू सावरण्यास सुरूवात केली असल्याने जि.प.त विरोधक नसल्यामुळेही पाणीटंचाई सारख्या अत्यावश्यक विषयावर आक्रमक भूमिका मांडायला कुणीही तयार नाही, अशी स्थिती आहे.
गेल्या आठवडाभरात ९ टँकर वाढले होते़ त्यानंतर ११ एप्रिलच्या आकडेवारीनुसार १४३ गावांमध्ये १२९ टँकर सुरू होते़ १५ एप्रिल चार गावांमध्ये चार टँकर वाढले़ ही संख्या अजून वाढण्याचाी शक्यता आहे़
निवडणूक ड्युटीविषयी गूढ
जिल्हा परिषदेतील साधारण ७० टक्के कर्मचाºयांची निवडणूक काळात ड्युटी लावण्यात आलेली आहे़ सामान्य प्रशासन विभागातील 90 टक्के कर्मचारी यात व्यस्त आहेत़ यात अधिकाºयांपासून शिपायांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे़ दरम्यान, निवडणूकीमुळे जिल्हाभरातील पाणीटंचाईचा विषय दुर्लक्षित होत असल्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागातील नेमक्या किती कर्मचाºयांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे याबाबत कर्मचाºयांमध्ये संस्पेन्स आहे़ प्रशिक्षण सर्वांनीच घेतले आहे, मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचीही आॅर्डर निघू शकते, अशी माहिती मिळाली़
आचारसंहितेमुळे नव्या योजना मंजूर न करण्याच्या व मंजूर योजनांचे इ टेंडरिंग न करण्याच्या सूचना आहेत़ त्यामुळे विहिरी अधिग्रहन व विहिर खोलीकरणावरच आपला भर आहे़ मंजूर कामांपैकी अधिकांश कामे झालेली आहेत़आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ - एस़ बी़ नरवाडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग