जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.३९ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:53 PM2019-11-02T12:53:00+5:302019-11-02T12:53:39+5:30
गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.
जळगाव : जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. केवळ भोकरबारी मध्यम प्रकल्पात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा होता. तर सर्व प्रकल्पांमध्ये मिळून गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.
गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
यंदाही जिल्ह्यात यंदा तब्बल २३ दिवस उशीराने पावसाचे आगमन झाले. मात्र त्यानंतर पावसाने अपवाद वगळता सातत्याने व जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा सरासरीच्या तब्बल १४० टक्के पाऊस झाला आहे.
या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प मिळून ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तिन्ही मोठे प्रकल्प तुडुंब
जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर हे तिन्ही प्रकल्प तुडुंब भरले आहेत.
हतनूरमध्ये पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे या धरणात सध्या ९९.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा व वाघूर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. वाघूर धरणाचेही सर्व २० गेट यंदा प्रथमच उघडावे लागले.
मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.३६ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ९७.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातील केवळ भोकरबारी धरणात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात मागील वर्षी शून्य टक्के पाणीसाठा होता. तर अन्य १२ पैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी या १० मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गूळ प्रकल्पा ९०.४१ टक्के व मन्याड प्रकल्पात ९९.९९ टक्के पाणीसाठा आहे.