जळगाव जि.प.त विरोधकांची जोरदार घोषणाबाजी व ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:39 PM2018-12-12T12:39:09+5:302018-12-12T12:40:05+5:30
समान निधीची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे कामकाज मनमानीपणे आणि नियमबाह्य पद्धतीने चालविल्याचा आरोप सत्ताधारी भाजपावर करीत विरोधकांनी समान निधीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.
सभागृहात म्हणणे ऐकून न घेतल्याने विरोधक शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर दोन्ही पक्षाचे गटनेते आणि सदस्यांनी जि. प. च्या आवारात सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणा देत सुमारे १० मिनिटे ठिय्या मांडला.
सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने
विरोधकांनी ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरु केल्यावर सत्ताधारी सदस्य हे जि.प. तून बाहेर येत असताना विरोधक व सत्ताधारी यांचा आमना सामना झाला. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
उपाध्यक्षांचे वाहन रोखण्याचा प्रयत्न
ठिय्या आंदोलन आटोपते घेतले त्याच वेळी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन हे वाहनातून जि. प.च्या आवाराबाहेर पडत असताना काहींनी उपाध्यक्षांचे वाहन अडवा, असे सुचविले. मात्र याकडे बहुतांशी विरोधकांनी दुर्लक्ष केल्याने वाहन अडविण्यासाठी पुढे झालेले तीन- चार सदस्यही माघारी झाल्याने वाहन रोखण्याचा प्रयत्न फसला.
आयुक्तांकडे तक्रार करणार
नियमानुसार मागील सभेचे इतिवृत्त सादर करणे गरजेचे होते. मात्र सत्ताधाºयांनी मनमानी करीत इतिवृत्त या सभेत न घेता, त्यांना हवे असलेले विषययच घेतले. हे नियमाला धरुन नाही. याबाबत आम्ही आयुक्तांकडे तक्रार करु -शशिकांत साळुंखे, राष्ट्रवादी गटनेता
निधी विरोधकांनाही मिळावा
सत्ताधारी पदाधिकारी आणि सदस्यांना सर्वांना सारखा निधी दिला असला तरी विरोधी सदस्यांना त्या तुलनेत खूपच कमी निधी दिला आहे. यामुळे आमची समान निधी वाटपाची मागणी असून सत्ताधाºयांचा निषेध करतो. -रावसाहेब पाटील, शिवसेना गटनेता