जळगाव जिल्हा दूध संघाकडून दुधाच्या फॅटच्या दरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:04 PM2017-11-02T13:04:17+5:302017-11-02T13:06:35+5:30
दुधाच्या दरात प्रति लीटर तीन रुपयाने कमी : इतर जिल्ह्यात जळगावपेक्षाही कमी दर
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - दुधाच्या फॅटचे दर कमी करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघाच्यावतीने घेण्यात आला आहे. यामध्ये म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर 50 पॉईंटने कमी करण्यात आले तर गायीच्या दुधाचे दर 25 पॉईंटने कमी करण्यात आले आहे. त्यामुळे दुधाचे दर प्रति लीटर 3 रुपयांनी कमी करण्यात झाले आहे. 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, दूध विक्रीचे दर मात्र कमी झालेले नाही.
पुरवठा जास्त असला की भाव कमी होतात या तत्वानुसार हे भाव कमी झाल्याचे दिसून येत आहेत. सध्या पावडर व बटरचे दर कमी झाल्याने तसेच दुधाचीही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर 50 पॉईंटने तर गाईच्या दुधाच्या फॅटचे दर प्रति फॅट 25 पॉईंटने कमी करण्यात आले आहे.
पूर्वी म्हशीच्या दुधाचे दर 36 रुपये होते ते आता 33 रुपये तर गायीच्या दुधाचे दर 27 रुपये होते, ते आता 24 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे. जवळपास तीन महिने तरी हे दर असेच राहतील, असे सांगण्यात आले.
इतर जिल्ह्यात कमी दर
जळगाव जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात असलेल्या दरांपेक्षाही इतर जिल्ह्यात एक ते दोन रुपये प्रति फॅट दर कमी असल्याचे सांगण्यात आले.
पावडर व बटरचे दर कमी झाल्याने तसेच दुधाची आवक वाढल्याने फॅटचे दर कमी करण्यात आले आहे. दुधाचे दर तीन रुपये प्रति लीटरने कमी झाले आहेत. ज्यावेळी दर वाढतात तेव्हा तो फरक दूध उत्पादकांना दिला जातो.
- मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ.