जळगाव जिल्ह्यात यंदा गुजरातमार्गे येणार मान्सून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:28+5:302021-06-02T04:13:28+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात नेहमी मुंबईमार्गे येणारा मान्सून यंदा मात्र गुजरातमार्गे येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून ...
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात नेहमी मुंबईमार्गे येणारा मान्सून यंदा मात्र गुजरातमार्गे येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर हवेचा दाब कमी असल्याने, मान्सूनचे वारे जास्त दाब असलेल्या लक्षद्वीप कराची व सौराष्ट्र गुजरातमार्गे जळगाव व धुळे जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती पुणे येथील कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
यावर्षी निर्धारित वेळेपेक्षा मान्सूनचे आगमन जिल्ह्यात लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी ९८ टक्के सरासरी इतका पाऊस होत असतो. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस होत असून, यावर्षी देखील सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यात यंदा ६२७ ते ६३९ मिमी इतका पाऊस होण्याचा अंदाज कृषी हवामान फोरम फॉर साउथ एशिया या हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात नेहमी मुंबई, कोकणमार्गे मान्सूनचे आगमन होत असते. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन जिल्ह्यात गुजरातमार्गे होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात ९ ते ११ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
जुन-जुलै सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
१.जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असले तरी, जुन व जुलै महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यातच सरासरी पैकी २२ टक्के पाऊस झाला होता.
२. जुलै व ऑगस्ट महिन्यात देखील तब्बल दहा वर्षांनंतर पावसाची सरासरी सर्वाधिक होती. मात्र, यावर्षी जुन व जुलै महिन्यांत पावसाच्या एकूण टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे. जुन महिन्यात जिल्ह्यात सरासरी पैकी १५ ते १६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात ही टक्केवारी वाढून ३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
३. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी वाढून एकूण सरासरीपैकी ५० ते ६० टक्के पाऊस या दोन महिन्यांत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यात परतीचा पाऊस लांबल्यास सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद यावर्षी देखील होण्याची शक्यता आहे.
यंदा कमी दिवसांत होणार अधिक पाऊस
यावर्षी जिल्ह्यात पावसाचा खंड हा सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड सर्वाधिक राहणार असला तरी पावसाच्या टक्केवारीत कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. यावर्षी जिल्ह्यात कमी दिवसांत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. एकाच रात्री ५० ते ६० मिमी या वेगाने पाऊस होऊन, सरासरीइतका पाऊस यंदाही होण्याची शक्यता आहे.
कोट..
यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मान्सूनचा वेग काहीसा मंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेचा दाब कमी असलेल्या गुजरातकडे मान्सून कूच करण्याची शक्यता असून सौराष्ट्र, गुजरातमार्गे जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन होऊ शकते. तसेच यंदा जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस देखील होण्याची शक्यता आहे.
-डॉ. रामचंद्र साबळे, संस्थापक सदस्य, कृषी हवामान फोरम साऊथ एशिया