जळगाव जिल्ह्यात कॉरीडॉरकरीता आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:29 PM2018-08-17T12:29:21+5:302018-08-17T12:30:16+5:30
वन्यजीव प्रेमींचा निर्णय
जळगाव : जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असली तरी वाघांच्या मृत्यूच्या घटनाही वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे. त्यासाठी जळगाव व यावल वनविभागाने २०१३ मध्येच दिलेला ‘मेळघाट-वढोदा-यावल-अनेर’ कॉरिडॉरसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तो तातडीने मार्गी लागावा यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय बुधवार, १५ रोजी सायंकाळी शारदाश्रम शाळेत झालेल्या वन्यजीवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच डिसेंबरअखेर दुसरी व्याघ्रपरिषद घेण्याचे ठरविण्यात आले.
न्यू कॉन्झर्व्हर फाऊंडेशनचे अभय उजागरे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, पर्यावरण शळेचे राजेंद्र नन्नवरे, समर्पण संस्थेच्या चेतना नन्नवरे, मराठी विज्ञान परिषदेचे देशपांडे, ग्रीन अर्थ फाऊंडेशनचे संजय पाटील, उपज फाऊंडेशनचे सुरेंद्र चौधरी, आॅर्कीड नेचर फाऊंडेशनचे सदस्य तसेच रविंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, रविंद्र फालक, प्रताप सोनवणे, अर्चना उजागरे आदी उपस्थित होते.
यावेळी यावल अभयारण्याची प्राथमिक मंजुरी आली. मात्र अंतिम नोटीफिकेशन ४९ वर्ष उलटूनही आलेले नाही. त्यामुळे अभयारण्यासाठीच्या सवलतींचा लाभ यावल अभयारण्याला मिळत नाही.