जळगाव जिल्ह्यात उमर खालीद, योगेंद्र यादव यांच्या सभांना पोलिसांची ना, परवानगीवरुन दोन्ही गट एस.पींच्या दालनात समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:02 PM2020-02-08T12:02:59+5:302020-02-08T12:03:35+5:30

सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात संविधान बचाव कृती समितीतर्फे केले होते आयोजन

In the Jalgaon district, Omar Khaled, Yogendra Yadav's meetings were held in the hall of the SP. | जळगाव जिल्ह्यात उमर खालीद, योगेंद्र यादव यांच्या सभांना पोलिसांची ना, परवानगीवरुन दोन्ही गट एस.पींच्या दालनात समोरासमोर

जळगाव जिल्ह्यात उमर खालीद, योगेंद्र यादव यांच्या सभांना पोलिसांची ना, परवानगीवरुन दोन्ही गट एस.पींच्या दालनात समोरासमोर

Next

जळगाव/भुसावळ/अमळनेर : उमर खालीद, योगेंद्र यादव व जिग्नेश मेवानी यांच्या सभांच्या परवानगीवरुन संविधान बचाव कृती समिती व संविधान समर्थन समिती या समर्थक व विरोधी पदाधिकारी असे दोन्ही गट शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या दालनात समोरासमोर आले होते. दोघंही आपआपल्या भूमिकांवर ठाम होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या सभांना परवानगी नाकारली आहे.
सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात संविधान बचाव कृती समितीतर्फे शनिवारी जळगाव, अमळनेर व भुसावळ येथे विद्यार्थी नेता उमर खालीद, योगेंद्र यादव व जिग्नेश मेवानी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी सभा होईलच असा निर्धार संविधान बचाव कृती समितीने केला आहे, तर संविधान समर्थन समिती व वकीलांनीही विरोध केला आहे.
खबरदारी म्हणून बंदोबस्ताव वाढ
जिल्ह्यात ३७ (१), (३) कलम लागू आहे. जिल्ह्यात येणाऱ्या नेत्यांना परवानगी नाकारण्यात आलेली असली तरी खबरदारी म्हणून तीनही शहरात पोलिसांची वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी रात्री या बंदोबस्ताचे नियोजन करुन तिघं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
असे आले दोघं गट एकत्र
संविधान बचाव कृती समितीच्या संयोजिका प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. काही लोकांच्या सांगण्यावरुन आपण परवानगी नाकारली आहे, त्याचा फेरविचार करावा. परवानगी दिली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल. परवानगी नाकारली तर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल व कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा शिंदे यांनी दिला. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करीत असतानाच भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट डॉ.उगले यांच्या दालनात आला. तेथे त्यांनी सभांना परवानगी देऊ नये म्हणून विनंती करुन निवेदन दिले. आमदार स्मिता वाघ यांनी या नेत्यांच्या सभांमुळे कुठे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्याचे पुरावे सादर केले. त्याचवेळी प्रतिभा शिंदे यांनी विरोधी गटाशीही चर्चा केली. दोन्ही गटांनी आपआपले निवेदने पोलीस अधीक्षकांना दिली. त्याशिवाय अ‍ॅड.निरंजन चौधरी यांनीही वकीलांच्या सह्या असलेले निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संविधान समर्थन समितीकडून आमदार गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार गुरुमुख जगवानी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी महापौर सीमा भोळे, स्थायी समितीच्या सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भगत बालाणी, नंदकिशोर महाजन,उज्ज्वला बेंडाळे, रा.स्व.संघाचे जिल्हा सहकार्यवाह हितेश पवार, अविनाश नेहते, किशोर चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे हरीष मुंदडा, बजरंग दलाचे ललित चौधरी अन्य पदाधिकारी होते. परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि नोटीस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
अमळनेरात भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे सुरेश पवार, योगीराज चव्हाण, गौरव माळी यांना पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी नोटीस बजावल्या आहेत.
अमळनेरात पोलिसांचे धक्कातंत्र, दोन्ही बाजूच्या लोकांना नोटिसा
अमळनेरात लोकशाही बचाव समितीच्यावतीने आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता बाळगून दोन्ही गटातील २१ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिस बजावण्यात आलेल्यांमध्ये लोकशाही बचाव समितीच्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, आदिवासी पारधी समाजाचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, बहुजन क्रांती मोर्चा, समन्वयक रणजित शिंदे , युथ फाऊंडेशनचे रियाजुद्दीन शेख, नगरसेवक फिरोज पठाण, संविधान बचाव कृती समितीचे प्रा. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक , रिपब्लीक पँथरचे गौतम सपकाळे, अल्पसंख्यांक समितीचे विभागीय अध्यक्ष रज्जाक शेख ,सुन्नी दारुलचे अध्यक्ष फयाजखा पठाण, नगरसेवक हाजी शेख मिस्तरी, वकील संघाचे अध्यक्ष शकील काझी, अ‍ॅड. रणजित बिºहाडे, अ. सत्तार रमजान शेख, भारती गाला यांचा समावेश आहे.
उगले-शिंदे यांच्यात बंदद्वार चर्चा
गिरीश महाजन यांचा गट गेल्यानंतर प्रतिभा शिंदे यांनी एकट्यात चर्चा करावयची असल्याची विनंती डॉ.पंजाबराव उगले यांना केली. त्यांनी ही विनंती मान्य करुन दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक व भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनाही दालनात प्रवेश नाकारण्यात आला होता.
सभा घेण्याचा निर्धार
लोकशाही बचाव नागरिक कृती समितीतर्फे अमळनेर व भुसावळ येथे आयोजित विद्यार्थी नेता उमर खालीद यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. समितीच्या सदस्यांनी सभा होईलच असा निर्धार केला आहे. लोकशाही बचाव नागरिक कृती समितीतर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात विद्यार्थी नेता उमर खालिद, आ.जिग्नेश मेवानी, योगेंद्र यादव यांची जाहीर सभा ८ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृहात आयोजित केली होती. अ‍ॅड.शकील काझी यांनी परवानगी मागितली होती. मात्र जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात ६ ते २० फेब्रुवारी दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच या सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सभेला परवानगी नाकारल्याचे पत्र पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी अ‍ॅड.काझी यांना दिले आहे.

जिल्ह्यात ३७ (१), (३) कलम लागू आहे. कायदा आणि सुव्यस्था राखली जाऊन शांतता रहावी म्हणून सभेला परवानगी नाकारली आहे. तरीही सभा घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
- डॉ.सचिन गोरे, अपर पोलीस अधीक्षक,चाळीसगाव

Web Title: In the Jalgaon district, Omar Khaled, Yogendra Yadav's meetings were held in the hall of the SP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव