अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जळगाव जिल्ह्यात २९३ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:40 AM2019-12-27T11:40:04+5:302019-12-27T11:57:50+5:30
आठ महिन्यात अडीच कोटी दंड वसूल
जळगाव : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जिल्हाभरात २९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यात २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात एकूण २४६ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक ५० लाख ५६ हजाराचा दंड जळगाव तालुक्यातून वसूल करण्यात आला असून सर्वाधिक ८ गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अवैध गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. सध्यादेखील वाळू उपसा बंद असतानाही वाळूची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे. या शिवाय जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठीदेखील अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गेल्या आठवड्यातच कारवाई करण्यात आली. कारवाई होत असली तरी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे जुमानत नसल्याचे चित्र कारवाईवरून दिसून येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात वाढली कारवाई
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाºया २९३ वाहनांवर कारवाई करीत २४६ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर २८ गुन्हे दाखल झाले. यात ३० सप्टेंबरनंतर वाळू उपशास बंदी असतानाही अवैध वाहतूक सुरूच आहे. एप्रिल ते आॅक्टोबर २०१९ अखेर झालेल्या कारवाईची आकडेवारी पाहता नोव्हेंबर या एकाच महिन्याची कारवाईची सरासरी जास्त असल्याचे दिसून येते.
आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात २३४ वाहनांवर कारवाई झाली तर नोव्हेंबर या एकाच महिन्यात ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
सर्वाधिक दंड जळगाव तालुक्यातून वसूल
कारवाई दरम्यान आठ महिन्यात सर्वाधिक ५० लाख ५६ हजार रुपयांचा दंड जळगाव तालुक्यातून वसूल करण्यात आला तर सर्वात कमी अर्थात एक रुपयांचाही दंड पारोळ््यातून करण्यात आलेला नाही. अशाच प्रकारे कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची संख्याही जळगाव तालुक्यातच जास्त असून आठ महिन्यात ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
सर्वाधिक गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखल
एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या आठ महिन्यात सर्वाधिक ८ गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखल झाले आहे तर जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव तालुक्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही.