जळगाव जिल्ह्यात पावसाने पाच तालुक्यात ओलांडली ५० टक्क्यांची सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:13 PM2019-08-04T23:13:47+5:302019-08-04T23:14:52+5:30
अद्यापही ७ मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा
जळगाव : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावूनही पावसाने सलग व जोरदार हजेरी लावत मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरीही अद्यापही जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
५ तालुक्यांनी ओलांडली सरासरीची पन्नाशी
मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशीरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७.४ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस या तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के तर पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.
एकाच दिवसांत २५ मिमी पाऊस
जळगाव तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्रीतून २४.९ मिमी पाऊस झाला. तर धरणगावला ३१.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस एका दिवसांत झाला. मात्र चाळीसगाव, बोदवड तालुका मात्र काल कोरडा होता.
मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकट
मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र बिकट आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात बहुळा मध्ये ०.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांमध्ये आजही शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरीत प्रकल्पांमध्ये सरासरी १८.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ७.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
पावसामुळे पिकांना फायदा
गेल्या आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फायदाच होणार आहे. मात्र शेतात पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी. अन्यथा पिक पिवळे पडण्याची भिती आहे. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपाशी लागवडीला जेमतेम महिना-दीड महिना झाला आहे. तसेच उडीद-मूगही वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावरील कीड पावसामुळे वाहून जाणार असल्याचे सांगितले.
मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढतोय पाणीसाठा
हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्यये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.