जळगाव जिल्ह्यात पावसाची पन्नाशीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:48 PM2019-08-04T12:48:13+5:302019-08-04T12:48:35+5:30
दमदार पावसाने जिल्हा आबादानी
जळगाव : जिल्हाभरात जामनेरवर यंदा वरूणराजाची कृपादृष्टी असून सततच्या पावसामुळे जामनेरात पावसाच्या टक्केवारीने शतकाकडे वाटचाल केली आहे़ जामनेरात आजपर्यंत ६५ टक्क््यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ दरम्यान, श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी दिल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात ४७.४ टक्के पाऊस झाला असून पावसाळ््याच्या दोन महिन्यात पन्नाशीकडे वाटचालीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, पावासाने हळूहळू हजेरी लावत जुलै अखेर पर्यंत हे चिंतेचे ढग दूर केले़ गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २८ टक्के पावसाची नोंद झाली होती, त्यात यंदा १९ टक्क््यांची वाढ होऊन ४७.४ टक्के पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात जामनेर खालोखाल पाचोऱ्यात ३७० मिमि पाऊस झाला आहे़ सततच्या पावसांमुळे धरणांच्या साठयातही वाढ होत आहे़
गिरणा धरणाचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर तर वाघूर धरणात २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून शेतीचे चक्र सुस्थितीत आले आहे़
सात तालुक्यात तीनशे पार
जिल्हाभरात एरंडोल, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाने तीनशेचा आकडा पार केला आहे़ या सात तालुक्यांमध्ये ३०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर जळगावसह सात तालुक्यांमध्ये २५० ते ३०० मिमिच्या आत पावसाची नोंद झाली आहे़ अमळेनर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे, काही तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़ जळगाव शहरात दुपारी झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते़ सर्वत्र पाणी साचले होते़
जामनेर तालुक्यात टंचाई दूर, अमळनेरात सर्वात कमी
जामनेर तालुक्यात शनिवारी ३६ मिमीच्या अधिक पावसाची नोंद झाली़ आजपर्यंत सर्वाधिक ४७० मिमी पाऊस जामनेरमध्ये झाला आहे़ त्यामुळे जामनेरवरील टंचाईचे ढग दूर होण्यास मदत झाली आहे़ यंदा सर्वाधिक जामनेर तालुक्यात टँकर सुरू होते़ अशा स्थितीत या पावसामुळे दिलासा मिळाला आहे़ दुसरीकडे अमळनेरात २१८ मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़
शेतीची कामे रखडली...
पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे वाफसा नसल्याने निंदणी करता येत नाही. शनिवारी सकाळी काही वेळ उघडीप होती त्यावेळी शेतांमध्ये निंदणी सुरु झाली. पाऊस सुरु झाल्याने ही कामे आता रखडली आहेत.