निम्मा पावसाळा उलटत आला तरी जळगाव जिल्ह्यात केवळ ३३ टक्केच पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:16 AM2019-07-28T01:16:58+5:302019-07-28T01:17:25+5:30
चोपडा तालुक्यात केवळ २६ टक्के पाऊस
जळगाव : पावसाळ््याची दोन महिने संपत आली तरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला असून चोपडा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच २६.६ टक्केच पाऊस झाल्याने या तालुक्यात चिंता वाढविली आहे. जामनेर तालुक्यात मात्र वरुणराजाने कृपा दृष्टी केली असून तेथे ४६.६ टक्के पाऊस झाला असून तालुक्याची वाटचाल पन्नाशीकडे सुरू आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला असून त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसाच्या झळा सोसत असताना यंदाही निम्म्याहून अधिक जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने बळीराजा चिंतातूर झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली खरी मात्र मध्यंतरी ओढ दिल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे निम्मा पावासाळा उलटला तरी पावसाने चाळीशीदेखील गाठलेली नाही. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी ३८.८ टक्के पाऊस झालेला असताना यंदा याच दिवसापर्यंत ३३.२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाअभावी पाण्यासाठी जे हाल झाले व पिकांनाही जो फटका बसला त्यापेक्षा यंदा जास्त हाल होण्यासह पिकांनाही अधिक फटका बसतो की काय अशी चिंता बळीराजाला लागली आहे.
जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात पावसाने चाळीशी गाठली नसताना जामनेर तालुक्यावर मात्र बळीराजाने कृपादृष्टी दाखविली आहे. २७ जुलै पर्यंत जामनेर तालुक्यात ४६.६ टक्के पाऊस झाला असून त्याखालोखाल एरंडोल तालुक्यात ४१.५ टक्के पाऊस झाला आहे. चोपडा तालुक्यात मात्र केवळ २६.६ टक्केच पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी (कंसात २७ रोजी झालेला पाऊस - मि.मी.मध्ये)
जळगाव - २९.७ (३०.३), जामनेर ४६.६ (३२), एरंडोल ४१.५ (१९.५), धरणगाव ३२.८ (२४.९), भुसावळ ३१.९ (३५.३), यावल २७.१ (२६.०), रावेर २९.१ (२१.४), मुक्ताईनगर ३३.५ (२५.३), बोदवड ३१.९ (२०.३), पाचोरा ३९.९ (२३.६), चाळीसगाव ३१.४ (५.१), भडगाव २९.३ (१६.३), अमळनेर ३१.९ (१६.८), पारोळा ३४.२ (९.२), चोपडा २६.६ (३४.७), एकूण ३३.२ (३४०.५)
तोंडापूर धरण १०० टक्के भरले
गेल्या २४ तासात तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढून धरण २७ रोजी सकाळी १०० टक्के भरले. सकाळी हे धरण ओसंडून वाहू लागले होते. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. यांदा मात्र हे २७ रोजीच १०० टक्के भरल्याने परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.
इतर धरण साठ्यात फारसी वाढ नाही
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये फारसी वाढ झालेली नाही. यामध्ये गिरणा धरणात २६ रोजी ७.५२ टक्के पाणी साठा होता. तो २७ रोजीही तेवढाच होता. हतनूर धरणात २६ रोजी २२.४३ टक्के पाणीसाठी होता तो २७ रोजी २२.५५ टक्के झाला. वाघूर धरणात २६ रोजी २०.६० टक्के साठा होता तो २७ रोजी २०.९८ टक्के झाला. यामध्ये हतनूर धरण क्षेत्रात मध्यप्रदेशात मोठा पाऊस झाला असला तरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आल्याने पाणीसाठी वाढू शकला नाही.