जळगाव जिल्ह्यात बारावीचा निकाल ३.५ टक्क्यांनी घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:02 PM2018-06-05T14:02:00+5:302018-06-05T14:02:00+5:30
विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ५ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्तेत ३.५ टक्क्यांनी घट झाली असताना परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रात पहिला ठरल्याने ही बाब शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक ठरत आहे.
यंदा उत्तर महाराष्ट्रातील ९८७ महाविद्यालयातील १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागाचा निकाल ८७.६२ टक्के लागला होता.
यावर्षी त्यात घट होऊन जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० टक्के इतका राहिला. एकाच वर्षामध्ये तब्बल ३.४२ टक्के घट आढळून आली आहे.
वाणिज्य वगळता सर्वच शाखांचा निकाल घटला
जळगाव जिल्ह्याचा संपूर्ण निकाल ८४.२० टक्के राहिला. त्यात विज्ञान शाखा ९५.३४, कला शाखा ७२.८९, वाणिज्य शाखा ९१.३४ तर किमान कौशल्य ७४.४९ टक्के राहिला. गेल्या वर्षी विज्ञान शाखा ९६.६८ टक्के, कला शाखा ७९.९२, वाणिज्य शाखा ९१.६४ तर किमान कौशल्य शाखा ७९.८६ टक्के निकाल होता. वाणिज्य शाखा वगळता अन्य सर्वच शाखांच्या निकालात यावर्षी घसरण झाली आहे.
गुणपडताळणीला सुरुवात
आॅनलाईन निकालानंतर गुरुवार ३१ पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुरुवार ३१ मे ते ९ जून पर्यंत हा अर्ज करता येणार आहे. तर छायाप्रतीसाठी १९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच छायाप्रत मिळविल्यानंतर ५ दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
बारावीचा निकालाचा टक्का का घसरला याचा शोध घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे. कॉपी रोखण्यासाठीही उपायोजना आवश्यक आहे.
१२ वीच्या निकालात यंदा ग्रामीण भागाने बाजी मारली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये जिल्ह्यातील ३१ शाळांचा निकाल हा १०० टक्के राहिला आहे. त्यातील ५ उच्च माध्यमिक विद्यालय वगळता बहुतांश शाळा या ग्रामीण भागातील आहेत. त्यात काही आश्रमशाळांचा देखील समावेश आहे.
परीक्षे दरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाºयांमध्ये वाढ
इयत्ता १२ वीच्या परीक्षे दरम्यान कॉपी केल्याप्रकरणी २२४ विद्यार्थ्यांवर शास्तीचा प्रस्ताव मंडळाकडे प्राप्त झाला. त्यातील जळगाव जिल्ह्यातील १०९, धुळे जिल्ह्यातील ५३, नाशिक जिल्ह्यातील ३६, तर नंदुरबार जिल्ह्यातील ०८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्च २०१७ मध्ये १३१, मार्च २०१६ मध्ये ११९ व मार्च २०१५ मध्ये ७१ विद्यार्थ्यांवर शास्ती करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात मार्च २०१५ मध्ये २४, मार्च २०१६ मध्ये ५१, मार्च २०१७ मध्ये २१ जणांवर कारवाई झाली होती. यावर्षी कारवाईत तब्बल पाच पट वाढ झाली आहे. गैरमार्गाचा अवलंब करणाºयांमध्ये जळगाव जिल्हा नाशिक, धुळे व नंदुबारच्या पुढे आहे.
परीक्षे दरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाºयांवर कारवाई
वर्ष प्राप्त प्रकरणे
२०१८ २२४
२०१७ १३१
२०१६ १३२
२०१५ ८६
(प्राप्त प्रकरणांची संख्या नाशिक विभागाची आहे.)