जळगाव जिल्ह्यात लाचखोरीत ‘महसूल’च अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:31+5:302020-12-24T04:15:31+5:30
जळगाव : लाचखोरीत प्रथम राहण्याची परंपरा यंदाही महसूल विभागाने राखली आहे. त्या खालोखाल पोलीस खात्यानेदेखील आपले दुसरे स्थान कायम ...
जळगाव : लाचखोरीत प्रथम राहण्याची परंपरा यंदाही महसूल विभागाने राखली आहे. त्या खालोखाल पोलीस खात्यानेदेखील आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. २०२० या वर्षात २० लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यात प्रांताधिकारी, तहसीलदार आदी महसूलच्या वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना लाचेचा मोठा मोह सुटला आहे. महिलादेखील यात मागे नाहीत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाचखोरांची संख्या कमी आहे. २०१९ मध्ये ३१ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. यंदा कोरोनामुळे सहा महिने लॉकडाऊन लागू असल्याने सरकारी कार्यालयातील कामेही थांबली होती, त्यामुळे लाचखोरीत घट झाली आहे. फक्त १० टक्के कर्मचारी, अधिकाऱ्यांनाच तेही अत्यावश्यक असेल तरच कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. असे असले तरी यंदा प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष लेखाधिकारी आदी बडे मासे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे तेदेखील काही काळ वैद्यकीय रजेवर होते, त्यांचा पदभार धुळ्याचे उप-अधीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे होता. कुराडे यांच्या काळात प्रांताधिकारी दीपमाला चौरे व अवल कारकून अतुल सानप हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. ठाकूर यांच्या काळात बोदवड तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ अधिकारी संजय शिरनाथ, राजेंद्र वाडे, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, सहकार विभागाचे जिल्हा लेखा विशेष परीक्षक रावसाहेब जंगले, सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे आदी बडे मासे जाळ्यात अडकले.
सहा अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी
जिल्ह्यातील विविध विभागाच्या सहा बडे अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत. या अधिकाऱ्यांनी अवैध मार्गाने मोठी मालमत्ता जमविल्याच्या तक्रारी असून, त्याची गोपनीय चौकशी सुरू झालेली आहे. सर्व पुरावे हाती आल्यावर अपसंपदेचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊन मालमत्ता जप्तीचीही कारवाई होऊ शकते, त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. २०१९ मध्ये दोन अधिकाऱ्यांवर अपसंपदेचे गुन्हे दाखल झाले होते. यंदा हा आकडा सहावर गेलेला आहे. सध्या हे प्रकरण चौकशीवर आहे.
कोट....
उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याबाबत आलेल्या तक्रारीवरून सहा अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. २०२० मध्ये दाखल २० प्रकरणांपैकी काही प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आलेले आहेत. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नागरिकांनीच जागरुक राहून लाचेची तक्रार द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते. मावळत्या वर्षात सर्वात जास्त महसूल विभागाच्याच भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या. महसूल व पोलीस हे दोन विभाग सतत भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे कारवाईवरून लक्षात येते.
-गोपाळ ठाकूर, पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
विभाग लाचखोर
महसूल ९
पोलीस ५
नगरपालिका १
सहकार १
जिल्हा परिषद १
वीज वितरण १
नगरभूमापन १
बीएसएनएल १