जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:45 PM2019-02-17T23:45:21+5:302019-02-17T23:45:42+5:30
विविध कार्यक्रमांद्वारे श्रद्धांजली
जळगाव : पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात विरमरण आलेल्या जवानांना जिल्हाभरात श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
भडगाव
शहरासह तालुक्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला. या संदर्भात भडगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील दुकाने बंद होती. बसस्थानक परिसरातील कॉम्प्लेक्ससह इतर व्यापारी संकुल, दुकाने, हॉटेल बंद होते. त्यामुळे बाजारपेठ भागांसह रस्त्यांवर शुकशुकाट होता. बंदच्या हाकेला व्यापारी, दुकानदारांनी, हॉटेल मालकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. बसस्थानकावर एस. टी. बसेस सुरु होत्या. मात्र प्रवाशांची गर्दी ओसरली होती. शहरासह तालुक्यात नागरिकांनी कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली.
वाङे येथे गावातील तरुणांनी सायंकाळी गावातून कँडल मार्च काढला. या कॅडल मार्चमध्ये अबालवृद्ध हजारोच्या संख्येने सहभागी झाले. जुनागाव मध्ये भारत मातेच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या पेटवून गावातून रॅली काढण्यात आली.
कजगाव, ता. भडगाव
येथील गावकऱ्यांनी १५ रोजी कँडलमार्च काढून श्रध्दांजली वाहली व कडकडीत बंद पाळला. येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपूर्ण गाव एकत्र येत येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. शनि महाराज मंदिराजवळ गावकºयांनी एकत्र येत जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून कँडल मार्चला सुरूवात केली. पवारवाडा, गडी परिसर, बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळा, बसस्टॅण्ड या भागातून मूक रॅली काढत भास्करनगर येथे समारोप करण्यात आला. यावेळी किरण शिंदे यांनी या आत्मघाती हल्ल्याबाबत शोक व्यक्त करीत गावाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण केली. या सोबतच कजगाव चाळीसगाव मार्गावरील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी गावातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या व काही सुट्टीवर आलेल्या जवानांनी प्रथम श्रद्धांजली अर्पण केली व त्या नंतर संपूर्ण गावाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या नंतर कजगाव चाळीसगाव मार्गावर दहशतवाद्यांचा पुतळा जाळण्यात आला. पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा देण्यात येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला
हिरापूर
हिरापूर येथे जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन कँडल मार्च काढण्यात आला. बाजार पट्टा परिसरात एकत्र जमून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम् गीतांनी सांगता झाली. निषेध मोर्चात पाकिस्तान मुदार्बाद, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी गाव दणाणून निघाले.
खेडगाव, ता. भडगाव
विरमरण आलेल्या जवानांना श्रध्दाजंली म्हणून येथे पेटत्या मेणबत्या हाती घेत गावातून फेरी काढण्यात आली. सावता महाराज मंदिरावर झालेल्या कार्यक्रमात जवानांप्रती विश्वास हिरे, वसंत शिनकर, विनोद बागुल यांनी शोकपर भावना व्यक्त केल्यात. सरपंच मनिषा सोनवणे, ग्रां.प. व सोसायटी सदस्य, गावी सुटीवर आलेले सैनिक, महिला व तरुणवर्ग यांनी रॅलीत सहभाग घेतला.
लोहारा, ता. पाचोरा
येथील राम राज फाउंडेशनच्यावतीने गावातून मशाल रॅली काढून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. रविवार बंद ठेवण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या आवाहनाला संपूर्ण गावकºयांनी प्रतिसाद देत कडकडीÞत बंद पाळला. बंद मधून दवाखाने व औषधी दुकाने वगळण्यात आले होते. इतर सर्व व्यवहार दुपारी चार पर्यंत बंद ठेवण्यात आले.
तळई, ता. एरंडोल
येथे शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यात अबालवृध्दांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून पाकीस्तान मुदार्बाद, शहीद जवान अमर रहे...अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. शहीद जवानांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण करुन अतिरेक्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी मेघराज पाटील, ज्ञानेश्वर कंखरे, सत्यवान पाटील, मधुकर ठाकूर, अमोल पाटील, श्रावण चौधरी, प्रकाश पाटील, समाधान पाटील, सुनील पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नापिंप्री
रत्नापिंप्रीसह होळपिंप्री, दबापिंप्रीत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेकडो ग्रामस्थांनी मेणबत्त्या पेटवून संपूर्ण गावात रॅली काढली. सडावन येथेही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.