जळगाव जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पेरण्या वाया जाण्याची भीती
By admin | Published: June 28, 2017 12:34 PM2017-06-28T12:34:54+5:302017-06-28T12:34:54+5:30
पेरण्या 50 टक्क्यांवर जाऊन थांबल्या. सव्वालाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस सुस्थितीत; बियाण्यांची पुन्हा मागणी
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28 - जिल्हाभरात 50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पण पावसाने ओढ दिल्याने तब्बल दोन लाख हेक्टरवरील पेरण्या वाया जाण्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी व्यवस्थितपणे न अंकुरलेल्या पेरण्या मोडायला सुरुवात झाली आहे. यातच पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्याही थांबल्या आहेत.
जिल्हाभरात सात लाख 67 हजार हेक्टरवर पेरण्यांचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठरविले होते. जूनच्या सुरुवातीला पेरण्या झाल्या. चोपडा, धरणगाव, जळगावमधील तापीकाठ व गिरणा काठावरील गावांमध्ये धूळ पेरण्याही केल्या. पण पाऊस व्यवस्थितपणे न आल्याने पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत.
सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीन 40 किंवा यापेक्षा अधिक मि.मी. पावसात अंकुरतो, पण अपु:या पावसात सोयाबीन अंकुरलाच नाही. जवळपास 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन मोडण्याची वेळ आल्याची माहिती आहे. यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग या पिकांची पेरणी वाया गेली आहे.
एक लाख हेक्टरवरील कोरडवाहू कापूसही कोमेजला
जवळपास एक लाख हेक्टरवरील कापसालाही कमी पावसाचा फटका बसला आहे. 11 जूननंतर अनेक शेतक:यांनी कोरडवाहू क्षेत्रातही कापसाची लागवड केली होती. पण हा कापूस न अंकुरल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतक:यांना सहन करावे लागले आहे.
कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदींच्या दोन लाख हेक्टरवरील पेरणीला फटका बसला आहे. तर जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिके सुरक्षित आहेत. अर्थातच जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पाऊसमान नाही. पण पाचोरा, एरंडोलचा पारोळानजीकचा भाग, पारोळा, अमळनेरचा दक्षिणेकडील अर्धा भाग, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये स्थिती बरी आहे. अधून मधून आलेल्या हलक्या पावसाने या भागातील पिकांना जीवदान दिले.
बियाण्याची मोठी उचल सध्या बाजारपेठेत सुरू आहे. पाऊसमान काही भागात बरे आहे. पण काही भागात पाऊसच नाही. कापूस, उडीद, मूग, सोयाबीन या बियाण्यांची दुबार पेरणीसाठी मागणी वाढल्याने जि.प.च्या कृषी विभागाने अधिकचे बियाणे कृषी आयुक्तालयाकडे मागितले आहे. कापसाचे बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याची कुठलीही टंचाई किंवा अडचण नसल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.