जळगाव जिल्ह्यात धो धो पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:24 PM2019-11-02T23:24:29+5:302019-11-02T23:24:35+5:30
जळगाव : खान्देशात अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी दोन दिवसाची उघडीप सोडली तर सुमारे दहा दिवसांपासून पाऊस ...
जळगाव : खान्देशात अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी दोन दिवसाची उघडीप सोडली तर सुमारे दहा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शनिवारीही दिवसभर पाऊस सुरु होता. शुक्रवारी रात्री तर जळगाव जिल्ह्यात पावसाने कहरच केला. यामुळे नदी व नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ६६ मीमी इतकी नोंद झाली आहे. गिरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धुळ्यात पावसाचा जोर कमी होता तर नंदुरबार जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला.
जळगाव जिल्ह्यात एकूण पावसाची शनिवारी ३६७ मीमी नोंद झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील गिरणा व वाघूर या दोन मोठ्या धरणांचे क्रमश: ६ आणि वीस दरवाजे उघडले आहेत. जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथे शुक्रवारी दुपारी नदीत वाहून गेलेला अतुल संजय पवार हा तरुण दुसऱ्या दिवशीही बेपत्ता होता.
पूल तुटल्याने वाकोदचा संपर्क तुटला
तर याच तालुक्यातील औरंगाबाद महामार्गालगतचा वाकोद जवळील गोसावीवाडीकडे जाणारा पूल तुटला आहे. यामुळे वाकोद गावाचा संपर्क तुटला आहे. तर औरंगाबाद - जळगाव वाहतूक शेजारील पर्यायी मार्गाने सुरु आहे. केवळ लांब अती अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक थोडे काम केल्यावर रविवारी सुरु होण्याची शक्यता आाहे. दरम्यान अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव, पारोळा आदी गावांना या पावसाचा अधिक फटका बसला आहे.
वरखेडीला शेतांमध्ये कंबरेएवढे पाणी
वरखेडी येथे नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांमध्ये कंबरेएवढे पाणी साचले आहे.
सागवीकरांनी सोडले गाव
जामनेर तालुक्यातील सांगवी येथे गोगडी धरण फुटल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांनी गाव सोडले मात्र भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंपळगाव हरे येथे घरांमध्ये शिरले पाणी
बहुळा नदीला पूर आल्याने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथे नदी पात्रालगत असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर मध्ये रस्त्यावरून कंबरेबरोबर पाणी वाहत होते. काही घरांमध्येही पाणी घुसले.