जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाने ओलांडली सत्तरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:51 PM2018-08-22T16:51:39+5:302018-08-22T16:56:30+5:30
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ३ तालुक्यांमध्ये पावसाने टक्केवारीची सत्तरी ओलांडली आहे. मात्र अद्यापही काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने ३० गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. मात्र गिरणा व वाघूर धरणात आता पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पावसामुळे गिरणा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.
जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र नंतर दडी मारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पावसाची आजच्या तारखेची सरासरी गतवर्षीच्या ४८.८ टक्के सरासरी पेक्षा जास्त म्हणजे ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाच्या सरासरीने सत्तरी पार केली आहे. त्यात एरंडोल ७९ टक्के, धरणगाव ७८.५ टक्के, पारोळा ७३.८८ टक्के पाऊस झाला आहे. तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ४९.१ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ५७.७ टक्के पाऊस झाला आहे.