जळगाव जिल्ह्यात आघाडीसह सेनेचा होणार सफाया - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:22 PM2018-10-11T12:22:52+5:302018-10-11T12:23:57+5:30

भाजपा बैठकीत घनाघात

Jalgaon district will lead the fight with the alliance - Girish Mahajan | जळगाव जिल्ह्यात आघाडीसह सेनेचा होणार सफाया - गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यात आघाडीसह सेनेचा होणार सफाया - गिरीश महाजन

Next
ठळक मुद्देविविध कामांचा आढावाधुळ्यात फिफ्टी प्लस मिळवू

जळगाव : पक्षाची जिल्ह्यात ताकद एवढी वाढली आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस- राष्टÑवादीचा सफाया होर्ईल तर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी येथे आयोजित पक्षाच्या विस्तृत बैठकीत व्यक्त केला.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची जिल्हा बैठक बुधवारी एमआयडीसीतील बालाणी लॉन येथे आयोजिण्यात आली होती. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार ए.टी. पाटील, जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विविध कामांचा आढावा
पक्षातर्फे राबविण्यात येणार असलेल्या विविध कामांचा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आढावा घेतला. खेलो महाराष्टÑ, सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड, महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व विधानसभा क्षेत्रात १५० कि.मी. पदयात्रा, जनजातीय क्षेत्र संपर्क अभियान, अनुसूचित जाती संपर्क अभियान, पेज प्रमुख संमेलन, महिला क्षेत्र संपर्क अभियान, ज्येष्ठ नागरिक कुंभ दर्शन आदी विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. आमदार सुरेश भोळे यांनी प्रास्ताविक केले.
धुळ्यात फिफ्टी प्लस मिळवू
जळगावात यश मिळविले तसेच धुळ्यात आज केवळ ३ नगरसेवक आहेत. पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे येथेही ५० पेक्षा अधिक जागा मिळवून दाखवू असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
जिल्हा राज्यात प्रथम
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, संघटनात्मक बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत यश हे संघटनेच्या बळावर मिळते आहे. जिह्यात आज आठ आमदार, दोन खासदार आहेत. न.पा., मनपा आता भाजपाच्या ताब्यात आहे. जामनेर, मुक्ताईनगरला पक्षास यश मिळाले.
आता चिन्हासाठी भांडण
पूर्वी न.पा., मनपा निवडणुका पक्षाच्या चिन्हावर नको असे कार्यकर्ते म्हणत याचे कारण मुस्लिम, दलित मते मिळणार नाहीत अशी भिती व्यक्त केली जात असे. आज अनेक मुस्लिम उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाच्या चिन्हासाठी उमदेवार भांडतात. या जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्टÑवादीची मक्तेदारी संपली याचे कारण आमची संघटना होय.
आता सर्वांचा सफाया
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस राष्टÑवादीचा पूर्णत: सफाया होईल, शिवसेनेचा एकही आमदार नसेल. जिल्ह्यात १०० टक्के आमदार हे भाजपाचे असतील. पेट्रोल, डिझेलच्या भावाचा बाऊ करू नका. पक्षाचे अनेक गोष्टी जनतेला दिल्या आहेत. त्या घेऊन लोकांपर्यंत जा, सकारात्मक गोष्टींचा प्रचार करा.
महात्मा गांधी आपल्या विचारांचे
महात्मा गांधी हे आपल्या विचारांचे होते कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखवा, असे सांगून महाजन म्हणाले, गांधीजी कॉँग्रेसचे नव्हते. या पक्षाने केवळ गांधीजींचा राजकीय वापर केला. स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेस बरखास्त करा असे गांधीजींनी सांगितले होते मात्र तसे झाले नाही.
महात्माजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५० कि.मी. पदयात्रेतून पंतप्रधान मोदी यांनी ग्रामीण जनतेसाठी दिलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पाहोचवा असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यापीठाचा प्रस्ताव खडसेंनी दिला
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ असा नामविस्तार करावा असा प्रस्ताव माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. आम्ही सर्वांनी त्यास पाठींबा दिला मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली. मनपासाठी १०० कोटी मागितले २०० कोटी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. निम्न तापी योजनेस एकरकमी दोन हजार कोटी मिळणार आहेत. जलसंपदा खात्यास आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ४० हजार कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला. मनपातील यशाच्या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू होते तरीही ५७ जागा मिळविल्या त्यामुळे न्यूनगंड बाळगू नका जनता तुमच्या बरोबर आहे, असा विश्वासह त्यांनी व्यक्त केला.
संघटनात्मक वाढीवर अधिक भर द्या - पुराणिक
आगामी काळात निवडणुका असल्याने संघटनात्मक बांधणीवर जास्त भर द्या यश तुमचेच असेल असे पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी यावेळी व्यक्त केले. संघटनात्मक कामकाजाबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. बैठकीस जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते.
खडसे आलेच नाहीत
बैठकीस माजी मंत्री एकनाथराव खडसे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते तसेच खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे हे बैठकीस आले नाहीत. ते का आले नाहीत, याचे स्पष्टीकरणही पदाधिकाऱ्यांनी न दिल्याने बैठकीत याबाबत चर्चा सुरू होती.
काहींची उपस्थिती चर्चेची ठरली
बैठक स्थळी माजी आमदार साहेबराव पाटील व्यासपीठावर होते. तसेच भुसावळ न.पा.तील विरोधी गटातील जनाधार पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, दुर्गेश ठाकुर हे पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या सोबत बराच वेळ बैठकस्थळी होते.
भारनियमनाचा बैठकीला फटका
बैठकस्थळी ४ वाजून २० मिनिटांनी वीज पुरवठा बंद झाला. भारनियमनाचा हा फटका तब्बल १५ मिनिटे बसला. अखेर वरिष्ठांना फोन केल्यावर वीज पुरवठा सुरू झाला.

Web Title: Jalgaon district will lead the fight with the alliance - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.