उत्पन्नवाढीमध्ये जळगाव विभाग राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:43+5:302020-12-06T04:16:43+5:30
एसटी महामंडळ : सर्वाधिक उत्पन्न जळगाव आगाराला दिवाळीतील कामगिरी : जळगाव, जामनेर व चोपडा आघाडीवर जळगाव : कोरोना रुग्णांची ...
एसटी महामंडळ : सर्वाधिक उत्पन्न जळगाव आगाराला
दिवाळीतील कामगिरी : जळगाव, जामनेर व चोपडा आघाडीवर
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने महामंडळाची सेवा पूर्वपदावर येत आहे. यंदाच्या दिवाळीत वाहतुकीचे नियोजन करीत जळगाव विभागाने उत्पन्नवाढीत राज्यभरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कोरोनामुळे सहा महिने महामंडळाची सेवा बंद असल्यामुळे या कालावधीत महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळे दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. दरम्यान, हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने यंदा दिवाळीच्या आधीच एक महिना तिकीट आरक्षणाला सुरुवात केली होती. एकीकडे रेल्वे गाड्यांची कमी संख्या आणि दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सला आवाजवी भाडे असल्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी महामंडळाच्या सेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा दिवाळीत महामंडळाच्या जळगाव विभागातील सर्व आगारांना चांगले उत्पन्न मिळाले. राज्यभरातील ३५ विभागांतून जळगाव विभागाने दिवाळीत १७ कोटी ४० लाख ९१ हजार इतके उत्पन्न मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.
इन्फो :
जळगाव आगार उत्पन्नात आघाडीवर :
जळगाव आगाराचे २ कोटी ६२ लाख इतके उत्पन्न आहे. त्याखालोखाल जामनेर आगाराने १ कोटी ९८ लाख तर चोपडा १ कोटी ८८ लाख इतके उत्पन्न मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर १ कोटी ४ लाख उत्पन्न मुक्ताईनगर आगाराला मिळाले आहे.