जळगावात डॉक्टरचे हातपाय बांधून ५ लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:55 PM2018-10-30T12:55:43+5:302018-10-30T12:56:40+5:30
रिंगरोडवरील रात्री ११ वाजेची थरारक घटना
जळगाव : रिंगरोडवरील एका अपार्टमेंटमध्ये एका महिला डॉक्टरचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करीत पाच लाख रोख व काही दागिने लांबविल्याची थरारक घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर डॉ.किशोर पाटील यांचे कामिनी कमल हॉस्पिटल आहे. त्या मागील एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ.निशांत पाटील व डॉ.अचल पाटील हे डॉक्टर दाम्पत्य वास्तव्य करते.
सोमवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास डॉ.अचल पाटील हे गणपती हॉस्पिटलमध्ये गेले. ते रवाना होताच थोड्याच वेळात तीन जण आले. त्यांनी फ्लॅटची बेल वाजविली. डॉ.अचल पाटील यांनी दरवाजा उघडताच त्यांनी घरात प्रवेश करीत त्यांचे तोंड दाबले व पैसे, दागिने कुठे आहेत, याबाबत विचारणा केली.
कपाटात असलेली पाच लाखाची रोकड त्यांनी चोरट्यांना दिली. यावेळी त्यांनी डॉ.पाटील यांच्या हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी हातपाय बांधून पोबारा केला.
त्यानंतर डॉ.अचल पाटील यांनी कसेबसे हातपाय सोडले व पती डॉ.निशांत पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घरी धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार कळविला. रात्री १२.३० वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी गांधी नगरात डॉ.नरेंद्र दोशी यांच्या निवासस्थानीही चोरट्यांनी डॉ.दोशी यांच्या पत्नीला मारहाण करीत पैसे लांबविल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशीच घटना अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर घडल्याने खळबळ उडाली आहे.