जळगाव - डॉ.हेमलता पाटील : नगराध्यक्षपदासाठी सर्व ठिकाणी उमेदवार
By admin | Published: October 21, 2016 07:33 PM2016-10-21T19:33:25+5:302016-10-21T19:33:59+5:30
आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच ठिकाणी स्वबळावर तयारी सुरु आहे. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आघाडी करण्यासाठी अनुकूलस्थिती आहे.
ऑनालाइन लोकमत
जळगाव, दि. २१ : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच ठिकाणी स्वबळावर तयारी सुरु आहे. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आघाडी करण्यासाठी अनुकूलस्थिती आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा सर्व ठिकाणी उमेदवार राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी डॉ.हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी काँग्रेस भवनात दुपारी ४ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते.
पक्ष चिन्हावर भर
काँग्रेस पक्षातर्फे एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, सावदा या पाच नगरपालिका स्वबळावर लढविण्याची तयारी आहे. तर यावल, फैजपूर, चोपडा यासह अन्य ठिकाणी आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती त्यांनी दिली. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशस्तरावरून एकही निर्णय नाही
नगरपालिकेसाठी उमेदवार निवडीचे अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिले आहेत. तालुकाध्यक्षांचे मत यासाठी विचारात घेतले जाणार आहे. आज जिल्हा निवड मंडळाची बैठक झाली. त्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार दिले असल्याने प्रदेशस्तरावरून कोणतेही निर्णय लादण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस
यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी सर्वच नगरपालिका क्षेत्रातून इच्छुक उमेदवारांची यादी जास्त आहे. मुलाखत घेताना निवडून येण्याची शक्यता आहे किंवा नाही हा निकष लक्षात घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपातील अंतर्गत वादाचा लाभ घेणार
डॉ.उल्हास पाटील यांनी जिल्ह्यात भाजपामध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात आहे. या वादाचा लाभ काँग्रेस घेणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्याकडे ५० मतदार आहेत. तसेच अन्य समविचारी पक्षाचा आमच्याशी संपर्क सुरू आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस चमत्कारिकरीत्या पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चोपडा, अमळनेर आघाडीबाबत चर्चा
जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे सांगितले. चोपडा व अमळनेर येथील आघाडीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसकडे आता नेत्यांची मोठी फौज असल्याने या निवडणुकीत यश हमखास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.