वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:01 PM2018-05-16T12:01:58+5:302018-05-16T12:01:58+5:30
गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढा-याची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली.
सुनील पाटील
आॅनलाईन लोकमत
जळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक प्रकरणात प्राणघातक हल्ला झालेला आहे. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढाºयाची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली. दोन गटात तेढ असो की गुन्हेगारी कारवाया असो गुन्हा करुन नंतर माफी मागायची, त्यासाठी यंत्रणा व समाजाला वेठीस धरायचे ही पध्दतच समाजासाठी घातक आहे. पोलीस सरकारी फिर्यादी होऊ लागल्याने गुन्हा करणाºयांची हिंमतच होऊ नये, अशा प्रकारांना ब्रेक लागावा या हेतूने सांगळे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. न्यायालयीन तारखांना कर्मचाºयांना हजेरी लावावी लागणार असली तरी गुन्हेगारीच्या घटनांना नक्कीच यामुळे आळा बसेल. नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत शस्त्रही बाहेर निघाले होते. काही जण जखमी झाले होते. या प्रकरणात पुढाºयांनी पुढाकार घेऊन जखमी तरुण व कुटुंबाची समजूत घालून पोलिसात तक्रार न देण्याबाबत राजी केले होते. दोन दिवस या प्रकरणात कोणीच फिर्याद दिली नाही. इतकी मोठी घटना व रात्रभर तणावाची स्थिती असताना फिर्याद द्यायला कोणीच पुढे न आल्याने सांगळे यांनी एका सहायक फौजदारलाच फिर्याद द्यायला लावले. बहुतांश प्रकरणात वरवर वाद आपसात मिटविले असले तरी त्यात फिर्याद न देण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस झाले आहेत. पोलीस फिर्यादी होत असल्याने गुंडगिरीला नक्कीच आळा बसेल अशी आशा आहे.