Jalgaon: लेकीकडे गेलेल्या वृद्धेचे घर फोडले, चोराला सुरतमधून उचलले, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
By विजय.सैतवाल | Published: August 28, 2023 05:57 PM2023-08-28T17:57:09+5:302023-08-28T17:57:33+5:30
Jalgaon Crime News : तांबापूर परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - तांबापूर परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच, त्याचे दोन साथीदार व एका अल्पवयीन मुलालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील तांबापूर परिसरात राहणाऱ्या तसलीमबी मोहम्मद सय्यद (६०) या महिला २६ जून ते ७ जुलै दरम्यान धुळे येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याची व तो सुरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी संयशित इश्तियाक अली राजीक अली याला २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (५५, रा. तांबापुरा), अनिस हमीद शेख (३१) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. इतर साथीदारांनादेखील ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे आदींनी केली.