Jalgaon Election जळगावातील ‘त्या’ उमेदवारांच्या घरी धडकल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:13 PM2018-08-06T14:13:32+5:302018-08-06T14:18:25+5:30
मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व उमेदवारांकडे महिलांनी पैशासाठी धडक दिल्याचे सांगितले जाते.
जळगाव : मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व उमेदवारांकडे महिलांनी पैशासाठी धडक दिल्याचे सांगितले जाते. प्रचंड गर्दी व संभाव्य वाद लक्षात घेता या उमेदवाराने पोलिसांनाच पाचारण केले आणि त्यांनतर ही गर्दी पांगली.
याबाबत घटना स्थळावर काहींनी दिलेल्या माहिती नुसार वृत्त असे की, प्रभाग १६ मध्ये मतदानाच्या दिवशी तेथील मतदार महिलांनी उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांचे घरी घरी सायंकाळी धडक दिली होती. महिलांची संख्या पाहता उमेदवाराने घराचे दरवाजे बंद करुन घेतले होते. गर्दी कमी होतच नसल्याने या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनाच पिटाळून लावल्याचा प्रकार घडला होता. चार दिवसानंतर या प्रभागातील महिलांनी रविवारी सायंकाळी पुन्हा या उमेदवाराचे घर गाठले. आता तरी ठरल्याप्रमाणे पैसे दे म्हणत पैशाची मागणी केली. हळूहळू करत चारशे ते पाचशे मतदार या उमेदवाराच्या घरी धडकल्यानंतर काहीही घटना घडू शकते याचा अंदाज आल्याने त्याने एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे शासकीय वाहन आल्याचे पाहून काही जणांनी स्वत:हून काढता पाय घेतला तर काही जणांनी मात्र पोलिसांसमोर उमेदवाराकडे पैशाची मागणी केली. भररस्त्यावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी, त्यानंतर या महिलांची गर्दी वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. रविवारीही काही महिलांनी उमेदवाराला शिव्यांची लाखोली वाहत येथून काढता पाय घेतला. दरम्यान या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
दुसऱ्या उमेदवाराकडेही गर्दी
याच प्रभागातील दुसरे उमेदवार भगत बालाणी या उमेदवाराकडे सकाळी त्यांच्या घराच्या परिसरातील काही मतदार पैशांची मागणी करण्यासाठी गेले होते. या उमेदवाराने काही जणांनी किंचीतशी रक्कम दिल्याची माहिती मिळाली. त्या उमेदवाराने पैसे दिले, मग तु का देत नाहीस असा जाब काही महिलांनी विचारला. या गल्लीत दोन उमेदवार राहतात.
शुभेच्छा द्यायला लोक आल्याचे स्पष्टीकरण
७-८ लोक पैसे मागण्यासाठी नव्हेत तर शुभेच्छा देण्यासाठी आले होते.मात्र विरोधकांनी आणखी लोक पाठवून घराजवळ गर्दी केली, असे काळे कुटुंबियांतर्फे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर प्रकाश बालाणी यांनीही शुभेच्छा देणाºयांचीच गर्दी होती असे स्पष्ट केले. पैसे वाटपाचा इन्कार केला.