जळगाव : चाळीसगाव पालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 02:42 PM2017-09-05T14:42:04+5:302017-09-05T14:42:38+5:30
चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली.
जळगाव, दि. 5 - चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली. गणपती मूर्ती संकलनासाठी शहरात हनुमानवाडी, सावरकर चौक, कॅप्टन कॉर्नर या तीन ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत. निर्माल्यासाठीदेखील संपूर्ण शहरातून घंटागाड्या फिरवल्या जात आहेत. धुळे रोड, हिरापूर रोड, नवीन नाका, खरजई नाका, शिवाजी घाट, चामुंडामाता मंदिर पूल, अहिल्यादेवी होळकर चौक, दत्तवाडी पूल, सदानंद हॉटेल जवळ अशा दहा ठिकाणी निर्माल्य संकलन केले जात आहे.
आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेनुसार अभियान राबविले जात असून नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी नागरिकांना मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रावर जाऊन पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे. चाळीसगाव शहरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविले जात आहे. मूर्ती व निर्माल्य संकलनामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अभियानाचे पर्वच या वर्षापासून सुरू होत असल्याची प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.
देशमुख नवरात्रोत्सव मंडळातर्फे १५ वर्षापासून मूर्ती संकलन
सुवर्णाताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळातर्फेही गेल्या १५ वर्षापासून गणेश विसर्जनाच्या पर्वावर मूर्ती व निर्माल्य संकलन केले जात आहे. या उपक्रमामुळे शहरातील अनेक विहिरींचे प्रदूषण थांबले. विशेष म्हणजे हनुमान वाडीतील विहीर पुर्नजिवीत झाली आहे. पूर्वी याच विहिरीत गणेश विसर्जन केले जायचे. मंडळातर्फे संकलित मूर्ती धरणाच्या पाण्यात एकत्रितपणे विसर्जित केल्या जातात. मंडळाचे अध्यक्ष व पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांनी हा उपक्रम १५ वर्षापुर्वी सुरु केला आहे. त्यांच्या मंडळामार्फत हनुमानवाडीत मूर्ती संकलन केले जाते. माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरु केल्याचे प्रदीप निकम यांनी 'लोकमत'शी बोलतांना सांगितले.