जळगाव : दोन लग्न झाले तरीही तिसरा संसार थाटला; अत्याचार तर केलाच, १९ लाखही लाटले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:09 AM2023-03-09T11:09:08+5:302023-03-09T11:09:27+5:30
गप्पागोष्टींतून साधली भावनिक जवळीक
जळगाव : दोन लग्न झाले तरीही आपण अविवाहित असल्याचे सांगून श्रीकृष्ण मेंगडे (४०) याने विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न थाटले. नंतर वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तब्बल १९ लाख १० हजार रुपये उकळून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही दोन मुलींसह वास्तव्यास आहे. पतीचे सन २००५ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे महिला ही घरगुती मेस चालवून आणि लेडीज गारमेंटसचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
श्रीकृष्ण मेंगडे हा सन २०१६ मध्ये मेसमध्ये जेवणासाठी येत होता. या काळात त्याने महिलेशी गप्पागोष्टी करून भावनिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. नंतर त्याने मी अविवाहित असून तू फार आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, सांगितले. पण, महिलेने नकार दिला. तरीही अत्याचार केले. त्याने महिलेच्या भावनांशी खेळून सर्वांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. सन २०१७ मध्ये त्याने पीडित महिलेशी लग्न केले. नंतर वेळोवेळी महिलेवर शारीरिक अत्याचार केले.
१९ लाख रुपये उकळले...
सन २०१७ ते २०१९ या काळात मेंगडे याने पीडित महिलेकडून वाहनाचे थकीत हप्ते भरण्यासह नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे, व्यापारासाठी पैसे लागत आहे, बाहेरगावी फिरण्यासाठी वेळोवेळी पैसे मागितले. असे एकूण १९ लाख १० हजार रुपये महिलेकडून उकळले. दरम्यान, वारंवार पैसे मागूनही परत न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर महिलेने न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. अखेर बुधवारी न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीकृष्ण मेंगडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ ४२०, ४९३, ४९५, ४९६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
पाठलाग केला अन् दोन लग्नांचा प्रकार उघड....
- मेंगडे हा पीडित महिलेसोबत राहत असताना दोन ते तीन दिवस बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरातून निघून जात होता. त्यामुळे महिलेला त्याच्या वागण्यावर संशय बळावला.
- ३० मे २०१९ रोजी महिलेने मेंगडे याचा पाठलाग केला. एका घरात जाताना दिसून आला. काही मिनिटांनी पीडित महिलाही त्या घरात आली.
- तेव्हा तिला दोन महिला दिसल्या. त्यांनी त्यांचे नाव सांगितल्यावर याबाबत पीडितेने मेंगडे याला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
- मेंगडे याची पूर्वी दोन लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती पीडितेला कळाली.