जळगावात सुविधा, पडताळणी नंतर २० दिवसात मिळणार पासपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:42 PM2018-06-01T12:42:53+5:302018-06-01T12:42:53+5:30
नव्या कार्यालयात आठवडाभरात ३५१ अर्जांची पडताळणी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - बहुप्रतीक्षेनंतर आठवडाभरापुर्वी जळगावात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने, खान्देशकरांचा नाशिकला जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचला आहे. शहरातील तहसिल कार्यालयाशेजारी गेल्या आठवड्यापासुन पासपोर्ट कार्यालयाची सेवा सुरु झाल्यानंतर, गुरुवारपर्यंत ३५१ अर्जांदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. दरम्यान पडताळणीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत नागरिकांना पासपोर्ट मिळू शकणार आहे.
गेल्या महिन्यांत २३ मे पासुन पोस्टामार्फत पासपोर्ट कार्यालयाची सेवा सुरु झाली असुन या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणुन मुंबई येथील पासपोर्ट कार्याालयातील राजन हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला डाक विभागाचे सब पोस्ट मास्तर सचिन सहाणे व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती केली आहे. भारत सरकारतर्फे टाटा कन्सल्टनसी सर्विसेसच्या मदतीने देशभरात आॅनलाईन पद्धतीने पासपोर्टचे सेवा देण्यात येत असुन, जळगाव पासपोर्ट केंद्रातही याच कंपनी मार्फत सेवा देण्यात आली आहे. या ठिकाणी अर्जदाराला अर्ज पडताळणीसाठी बोलावल्यानंतर, ए.बी.आणि सी. अशा तीन प्रक्रियेत अर्जदाराच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यामध्ये ए प्रक्रियेत अर्जदाराच्या कागदपत्रांची तपासणी करुन, त्याच्या हाताचे ठसे, फोटो आणि इतर आवश्यक माहिती नोंदवली जात आहे. त्यानंतर बी या प्रक्रियेत पुन्हा अर्जासोबत असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर सी या प्रक्रियेत अर्जदाराच्या कागदपत्रांची अंतिम तपासणी करण्यात येऊन, तो पासपोर्टसाठी पात्र आहे की नाही, हे ठरविण्यात येते. कागदपत्रांची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अर्जदाराला फाईल नंबर देऊन, पोलीस पडताळणीसाठी संबधित पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
पासपोर्टची प्रक्रिया याप्रमाणे
पासपोर्ट काढण्यासाठी प्रथम वेबसाईटवर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना अर्जामध्ये दिलेल्या सूचनेच्या आधारे संबंधित कागदपत्रांच्या नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर स्वतंत्र ईमेल आयडी तयार झाल्यानंतर, अर्ज भरावा लागतो. यामध्ये अर्जदाराला दोन प्रकारे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये साधा अर्ज व दुसरा तात्काळ अर्ज आहे. नेहमीच्या साध्या अर्जासाठी दीड हजार रुपये फी असून या अर्जाद्वारे जळगावलाच पासपोर्ट काढता येणार आहे. यामुळे खान्देशातील नागरिकांची सोय झाली असून त्यांना मुंबई, नाशिका आदी ठिकाणी जाण्याचा त्रास आता वाचला आहे. स्थानिक पातळीवर सुविधा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पासपोर्ट कार्यालयातील अर्ज पडताळणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर, हा अर्ज पोलीस चौकशीसाठी अर्जदाराचा रहिवास असलेल्या पोलीस स्टेशनला पाठविण्यात येत आहे. पोलिसांतर्फे अर्जदाराची चौकशीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर, अंतिम अहवाल पुन्हा पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवुन, साधारणत: १५ ते २० दिवसांनी अर्जदाराच्या हातात पासपोर्ट मिळणार आहे.
तात्काळला फी जादा
तात्काळ पासपोर्टची सेवा जळगावी उपलब्ध नसुन, नाशिक येथे ही सेवा उपलब्ध आहे, यासाठी साडेतीन हजार फी आकारण्यात येते. हा अर्ज भरतांना पुर्वी अर्जदाराला आयपीएस अधिकाऱ्याकडुन व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि संबंधित अधिकाºयाच्या ओळखपत्राची प्रत स्वाक्षरी सहित सादर करावी लागायची. मात्र, आता आधारकार्ड, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायन्सची आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यानंतरही सात दिवसांच्या आत तात्काळ पासपोर्ट मिळतो.
गेल्या आठ दिवसांपासुन कार्यालय सुुरू झाल्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणाहुन नागरिक पासपोर्टच्या कामासाठी येत आहेत. अर्जांची संख्या वाढत असल्याने, नागरिकांना लवकर पासपोर्ट मिळण्यासाठी पडताळणीची संख्या वाढविण्याचा विचार वरिष्ठ स्तरावर विचार आहे. तसेच नागरिकांना बसण्याची सोय व्हावी यासाठी कार्यालयाच्या बाहेर शेड व आसन व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
-राजन हिरे, केंद्रप्रमुख, पासपोर्ट सेवा केंद्र, जळगाव